“काही गरज नाहीये मला विम्याची. मी मेल्यानंतर हवाय कोणाला तो पैसा. आपण मेलो की जग बुडालं.” एक काळ होता जेव्हा विमा पॉलिसीकडे (इन्शुरन्स) “माणूस मेल्यानंतरचा पैसा” म्हणून पाहिले जायचे. काळ बदलला. आर्थिक साक्षरता वाढली. मानवी आयुष्य अमूल्य जरी असले, तरी अनिश्चित देखील आहे. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू, अपघात किंवा अपंगत्व आल्यामुळे होणारे “आर्थिक नुकसान” काही प्रमाणात तरी भरून काढण्याचे आर्थिक उपकरण म्हणून “इन्शुरन्स”कडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले. परंतु लाईफ इन्शुरन्स केवळ एखादी दुर्दैवी घटना घडून गेल्यावरच नुकसान-भरपाई म्हणून आर्थिक आधार देतो काय? पुन्हा एकदा विचार करा. लाईफ इन्शुरन्सचा अजून एक महत्वाचा पैलू आहे “मॅच्युरिटी बेनिफिट्स”.
पॉलिसीधारकाचे पॉलिसी टर्मच्या दरम्यान निधन झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाला आश्वासित केलेली आर्थिक सुरक्षितता म्हणजे “Sum Assured” प्रदान केली जाते. परंतु पॉलिसीधारकासोबत पॉलिसी-टर्मच्या दरम्यान कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही आणि त्याने पॉलिसीचा कालावधी यशस्वीपणे पूर्ण केला तर त्याने वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे भरलेले प्रीमियम इन्शुरन्स कंपनी त्याला परत करेल काय? पारंपारिक टर्म इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत अशी कोणतेही परतफेड केली जात नाही. मात्र अशा वेळी इन्शुरर पॉलिसीधारकाला एक ठराविक रक्कम बोनसच्या रक्कमेसह प्रदान करतो. या जीवन लाभाला “मॅच्युरिटी पे-आउट” किंवा “मॅच्युरिटी बेनिफिट्स” म्हणतात.
मॅच्युरिटी बेनिफिट्स देणाऱ्या काही पॉलिसीज् पुढील प्रकारच्या असतात -
(१) TROP अर्थात टर्म इन्शुरन्स विथ “रिटर्न ऑफ प्रीमियम” प्लॅन
अशा प्रकारच्या प्लॅन्समध्ये पॉलिसी-टर्मच्या दरम्यान पॉलिसीधारकाला मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबाला, नॉमिनीला निश्चित केलेली रक्कम एकाचवेळी (lump sum) किंवा टप्प्या-टप्प्याने किंवा दोन्ही स्वरूपात विभागून दिली जाते.आणि जर विमाधारक व्यक्ती पॉलिसीच्या मुदतीत जिवंत राहिली तर त्याला भरलेल्या सर्व प्रीमियमची रक्कम (GST चार्जेस वगळून) परत केली जाते.
(२) ULIP अर्थात युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स:
युलिप प्लॅन्समध्ये, पॉलिसीधारक जो प्रीमियम भरतो, त्याचा काही भाग शेअर मार्केटसारख्या आर्थिक उपकरणांमध्ये गुंतवला जातो. अर्थातच ह्या गोष्टी मार्केटसोबत जोडलेल्या असल्याने जोखमीची शक्यता देखील असतेच. सोबतच त्यावर काही चार्जेस देखील भरावे लागतात. मात्र ULIP सारखे प्लॅन्स इक्विटी मार्केटसारख्या क्षेत्रामधील गुंतवणुकीमुळे होणाऱ्या नफ्याचा फायदा पॉलिसीधारकांनाही देतात. परंतु पारंपारिक इन्शुरन्स प्रॉडक्ट्समधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या रिटर्न्सप्रमाणे निश्चित परताव्याची खात्री नसते. कारण रिटर्न्स हे मार्केट-परफॉर्मन्सवर अवलंबून असतात. परंतु पॉलिसीधारकांना फंडामधील पैसे काढण्याचे स्वातंत्र्य मात्र असल्याने लवचिकता (Flexibility) असते.
(३) एंडॉवमेंट प्लॅन्स:
इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्सचे लाईफ कव्हर असा दुहेरी फायदे देणारे प्लॅन्स म्हणजे “एंडॉवमेंट प्लॅन्स”. या प्लॅन्समधील जमा झालेला निधी इन्शुरन्स कंपनी सहसा डेट फंड्स (Debt Funds) मध्ये गुंतवते. रिटर्न्स जास्त जरी मिळत नसले तरी देखील रिस्क (जोखीम) देखील कमी असते. त्यामुळे पॉलिसी मॅच्युअर्ड झल्यावर मिळणारे रिटर्न्स देखील तुलनात्मकदृष्ट्या कमी असतात.
पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर गुंतवणूक किंवा प्रीमियम बोनसच्या सहित परत करणाऱ्या एंडोमेंट किंवा ULIP सारख्या पॉलिसीज् बचत किंवा गुंतवणूक साधन म्हणून काम तर करतातच, परंतु दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास आर्थिक सुरक्षितता देखील प्रदान करतातच. शिक्षण, प्रवास, मुलांची लग्न, इ. अशा ठराविक कालावधीमध्ये येणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्या कित्येकदा “मॅच्युरिटी अमाऊंट”च्या सहाय्याने पूर्ण करता येणे शक्य होत असते.
एवढेच नव्हे तर, भारतीय आयकर कायदा, १९६१ अनुसार, पॉलिसीधारक “मॅच्युरिटी बेनिफिट्स” देणाऱ्या पॉलिसींसाठी भरलेल्या प्रीमियमवर कर लाभ (Tax Benefits) मिळवण्यास देखील पात्र असतो. पॉलिसीधारक जी प्रीमियमची रक्कम भरतो, त्यावर कलम 80C कर-वजावटीची (tax deduction) क्लेम करता येते. तर याच कायद्याचे कलम 10(10D) अंतर्गत, पॉलिसीधारकाला मिळणारी “मॅच्युरिटी अमाऊंट आणि बोनस” (काही अटी वगळता) करमुक्त स्वरूपाची असते.
तेव्हा लाईफ इन्शुरन्सचे फायदे केवळ तुमच्या कुटुंबासाठी फक्त “”सेफ्टी-नेट” असण्यापेक्षाही पुढे जातात. “मॅच्युरिटी बेनिफिट्स” चांगले आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात मदत करू शकतात आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमची स्वप्ने पूर्ण करू इच्छित असाल म्हणजे “जिंदगी के साथ भी” उपयुक्त ठरू शकतात.