Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Anuroop Vivah Sanstha सामाजिक भान जपणारी विवाह संस्था

Anuroop Vivah Sanstha सामाजिक भान जपणारी विवाह संस्था

Image Source : www.anuroopwiwaha.com

अनुरुप विवाह संस्थेच्या कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. गौरी कानिटकर यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या यशस्वी उद्योगाचे रहस्य...

उत्तम लेखिका आणि वक्त्या असणाऱ्या गौरी यांनी 1975 साली ‘लग्न जुळवणं’ हे एक सामाजिक काम म्हणून अनुरुप विवाह संस्था सुरु केली. गौरी कानिटकर यांना मानसशास्र विषयाची आवड असल्याने, त्यांनी डॅा. आनंद नाडकर्णीं यांचे जवळपास 40 मानसशास्रीय कोर्सेस करुन ‘मानसशास्रीय समुपदेशनाचे’ काम सुरु केले होते. मु्क्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात गौरी कौटुंबिक समुपदेशनाचे काम करत होत्या. लग्न संस्थेत तसेच मुलांमुलींच्या विचारधारेत झालेले बदल ठळकपणे जाणवत होते, म्हणून 2000 साली बॅकेतील नोकरी सोडून पूर्णवेळ अनुरुपचे काम करायचे गौरी यांनी ठरवले.

अनुरूपसाठी समुपदेशन आणि डॅाक्टरेट पदवी

मुलामुलींच्या गरजा, अपेक्षा, लग्नसंस्थेतले बदल,  सामाजिक गोष्टी समजून घेऊन समुपदेशनाचे काम करण्यासाठी एम.ए करून ‘गेल्या शंभर वर्षातील मराठी नाटक आणि बदललेली विवाह संस्था’ या विषयात डॅाक्टरेट मिळविली.

‘अनुरूप’च्या प्रसार आणि प्रचारासाठी वृत्तपत्रात लेखन

अनुरुपमध्ये काम सुरु केल्यावर वधुवरांना, त्यांच्या पालकांना व्यक्तीगत मार्गदर्शन केले. जास्त जणांपर्यंत माहिती पोहचावी या उद्देश्याने सकाळ वृत्तपत्रात लेख लिहायला सुरुवात केली. लग्न हा संस्कार राहिला नसून, तो आता इव्हेंट झाला आहे. खूप वेळ आणि  पैसा खर्च करण्यापेक्षा नातं कसं बळकट होईल, याचा विचार मुला-मुलींना करायला पाहिजे असे गौरी सांगतात.

सामाजिक बदलांचा विचार करणे गरजेचे

‘लग्न जुळवणं’ हा व्यवसाय करताना या सर्व सामाजिक बदलांचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. अनुरुपमधे लग्न तर जमतेच, पण लग्नानंतरही अनुरुपच्या मदतीचा हात सभासद आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी कायम सज्ज असते. लग्नानंतर नवदांपत्य, दोघांचे आई-वडील असे सहाजणांचे समुपदेशन मोफत केले जाते. प्रत्येक सभासदाला एक समुपदेशन सेशन मोफत मिळते.  

टेक्नॉलॉजीमुळे परदेशात ‘अनुरूप’ ला पसंती   

गौरी यांनी अनुरुपचे काम सुरु केले तेव्हा बाहेरील जगात टेक्नोलॉजी मध्ये क्रांती घडत होती.  त्यावेळेस अनुरुपही प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि सेवा पुरवत होते.पुढे मात्र गौरीताईंची मुलं या व्यवसायात आली आणि टेक्नॉलॉजी अनुरुपचा अविभाज्य भाग बनली.अमेय कानिटकर अनुरुपची सर्व टेक्निकल बाजू सांभाळतात, तन्मय कानिटकर हे उत्कृष्ट लेखक, वक्ते आहेत. त्यांचे ‘लग्न कल्लोळ’ हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी भाषेत प्रसिध्द झाले आहे. वेबसाईट, ऑनलाईन रजिस्ट्रेशन यामुळे थेट परदेशातून सभासद नोंदणी करणे सोपे झाले आहे. कोरोनाच्या  काळात ऑनलाईन समुपदेशन देखील चालूच होते.

head image 2
अनुरूप विवाह संस्थेच्या संस्थापक डॉ. गौरी कानिटकर.

व्यवसायामध्ये काळानुरुप बदल घडायला हवेत

आज अनुरुप संस्थेत समुपदेशक, टीम वर्कर्स, मॅनेजर, सभासदांना सर्व माहिती देणारे, फॅालोअप ठेवणारे, टेक्निशियन्स अशी विविध पातळीवर काम करणारी मंडळी आहेत.यांची संख्या जवळपास 45 इतकी आहे.या सर्व मंडळींचे सतत ट्रेनिंग चालू असते.नवीन टेक्नॅालॅाजी आत्मसात करणं, ती रोजच्या कामात वापरणं, त्याचा प्रत्यक्ष फायदा संस्थेच्या सभासदांना मिळणं, हे सुरूच असते. व्यवसायामध्ये काळानुरुप बदल घडायला हवेत, सतत अपग्रेड राहणे, नवनवीन आव्हाने स्विकारणं, यासाठी अनुरुप कायमच आग्रही असतो.

समाजातील बदलांचा अभ्यास महत्त्वाचा

लग्न जमवताना प्रत्येक शहराच्या तिथल्या समाजाच्या चालीरीती, जातीनिहाय अभ्यास, समुपदेशन, व्याख्यानं आयोजित करणं, गरजेचे असते. छोटी गावं आणि मेट्रो सिटी यातला सामाजिक परिस्थितीमधला बदल लक्षात घेऊन अभ्यास करणे गरजेचे असते. समाजातील बदलांचा अभ्यास सतत केला जात असल्याने अनुरुपचे काम त्या गरजांप्रमाणे बदलते.

दिव्यांगांसाठी केवळ शंभर रुपयांत नोंदणी

समाजात एकेरी पालकत्व, लिव्ह इन रिलेशनशिप, घटस्फोटीत वधु-वर, दिव्यांग, सिनियर लोकांसाठी या वयात जोडीदाराचा अकाली मृत्यू झाल्याने पुनर्विवाह करु इच्छिणारे अशा विविध पातळींवर अनुरुपचे काम चालू आहे. सामाजिकतेच्या व्यापक दृष्टिकोनातून अनुरुपमधे दिव्यांगांसाठी केवळ शंभर रुपयांत नोंदणी आणि स्थळ मिळवून द्यायला व्यक्तीगत लक्ष दिले जाते.

head image 1

व्यवसायाचा एकांगी विचार करू नये

गौरी यांची ‘लग्नाआधी’,’शोध अनुरूप जोडीदाराचा’, ‘रंग लग्नाचे, लग्नापूर्वी जाणायचे’ ही तीन पुस्तके प्रसिध्द झाली आहेत. समाजात बदल घडत गेले त्यानुसार  अनुरुपचे काम वाढले.या बदलांकडे व्यवसायाची संधी बघतानाच सामाजिक भान मात्र अनुरुप विसरत नाही.व्यवसाय कोणताही असो, त्याचा केवळ एकांगी विचार करुन चालत नाही, तर चहुबाजूने विचार करायला हवा.पैसे मिळवणे  हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असला तरी सामाजिक जाणिवेतून अनुरुप विविध उपक्रम आयोजित करते.यामध्ये  विविध चर्चासत्रे, शिक्षण देणारे विविध कार्यक्रम, ज्योतिष शास्र, लग्नापूर्वी वधुवरांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन, वर्कशॅाप, सेमिनार, टॅाक-शो सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजित केले जातात. हे सर्व कार्यक्रम मोफत असतात. तसेच, थेट- भेट हा वधु-वरांचा भेटण्याचा कार्यक्रम असतो.

सर्व जातींसाठी स्थळांची नोंदणी

शुभारंभ नावाची ऑनलाईन सेवा अनुरुपतर्फे दर शनिवारी पालकांसाठी ठेवली आहे. या सेवेत अनुरुप विवाह अॅप कसे वापरायचे याबद्दल  मुला-मुलींच्या पालकांना प्रात्यक्षिक दिले जाते. अनुरुपची सुरवात केवळ एका जातीतील मुला-मुलींची लग्न जुळवण्यापासून झाली होती. आता येथे सर्व जातींसाठी स्थळांची नोंदणी केली जाते. अनुरुपमध्ये  प्रत्येकाला व्यक्तिगत समुपदेशन आणि मदत दिली जाते.

‘इथे लग्न टिकते, बहरते आणि प्रगल्भ होते’

90,000 च्या वर यशस्वी लग्न जमवलेली, 45,000 पेक्षा जास्त सभासद संख्या असलेलीअनुरुप विवाह संस्था आज चौथ्या दशकात उभी आहे. बडोदा येथे सुद्धा अनुरुपची शाखा नुकतीच सुरु करण्यात आली. ‘इथे लग्न जमते’ ही टॅगलाईन असलेली अनुरुप विवाह संस्था ‘इथे लग्न टिकते, बहरते, फुलते, प्रगल्भ होते’ असा प्रवास करत स्वतः देखील बहरली आहे.

स्त्रोत: यशस्वी उद्योजक