मास्टरकार्डने त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड (Credit card)-डेबिट कार्डद्वारे (Debit card) पेमेंट करणे सोपे जावे म्हणून नवीन मार्ग काढला आहे. पूर्वी पेमेंट करताना कार्ड धारकांना CVC द्यावा लागायचा. मात्र, कंपनीने आणलेल्या या सुविधेनुसार आता कार्ड धारक CVC विना पेमेंट करू शकणार आहेत. या निर्णयामुळे कार्ड धारकांचा वेळ वाचणार असून पेमेंटही सुरक्षित होणार असल्याचा कंपनीने विश्वास व्यक्त केला आहे.
Table of contents [Show]
प्रक्रिया कशी असणार आहे?
तुम्हाला डेबिट-क्रेडिट कार्डच्या मागे असलेला 3 अंकी (CVC) नंबर पेमेंट करण्यासाठी न देता, कार्ड धारकाला आधीच त्याची डिटेल्स व्यापाऱ्यांच्या वेबसाईट किंवा अॅपवर सेव्ह करावी लागणार आहे. त्यानंतर खरेदी केल्यानंतर प्रत्येक पेमेंटसाठी त्यांना CVC नंबर देण्याची गरज भासणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँकच्या (RBI) टोकनायझेशनच्या नियमानुसार, एकदा कार्ड डिटेल्स दिल्यानंतर, त्यांना त्याचे कार्ड निवडावे लागणार आहे. त्यानंतर त्यांच्या फोनवर आलेला ओटीपी टाकावा लागणार आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर CVC विना त्यांचा व्यवहार पूर्ण होणार आहे. या सुविधेमुळे पेमेंट करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार आहे.
मार्केटमध्ये 'या' कंपन्यांनी केला प्रारंभ
याआधीच मार्केटमध्ये झोमॅटो आणि कॅश फ्री पेमेंट्सने CVC लेस सुविधा द्यायला सुरूवात केली आहे. CVC काढल्यानंतर, व्यापारी चेक आउट करताना लागणारा वेळ कमी करून, ग्राहकांना या सुधारित पेमेंटचा अनुभव देऊ शकतात. आता या सुविधेत मास्टरकार्डने ही प्रवेश केल्याने इतरही कंपन्या या सुविधा ग्राहकांना देण्यासाठी मार्केटमध्ये उतरण्याची शक्यता आहे.
सर्वोत्तम सुविधा देण्याचे ध्येय!
मास्टरकार्ड त्यांच्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना नवीन आणि सुरक्षित पेमेंट उपाय देण्यासाठी वचनबद्ध आहे. डेटा सुरक्षेबरोबर, टोकनाईज्ड कार्डवर CVC लेस पेमेंटमुळे स्थानिक पातळीवर पेमेंट सुरक्षित आणि सुरळीत व्हायला मदत होणार असल्याचे मास्टरकार्डचे दक्षिण आशियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनुभव गुप्ता यांनी सांगितले आहे.
'या' सुविधेमुळे वाढली सुरक्षा
CVC विना व्यवहार ही नवीन सुविधा खूप सुरक्षित आहे, कारण तिच्यात टोकनायझेशनचा वापर केला आहे, जी फसवणूकीपासून सुरक्षित ठेवते. तसेच, कार्डचे डिटेल्स टोकनमध्ये बदलल्यामुळे, हॅकर्सला क्रेडेंन्शिअल चोरणे अवघड होऊन जाते. त्यामुळे CVC लेस पेमेंट ग्राहकांच्या सोयीचे असून यावरून व्यवहार अधिक सुरक्षित आणि जलद पूर्ण करणे तसेच, सुविधा वाढवणे शक्य झाले असल्याचे झोमॅटोचे सीएफओ अक्षंत गोयल यांनी म्हटले आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            