प्रदूषण रोखण्यासाठी मारुती सुझुकी भविष्यामध्ये मोठं काम करणार आहे. त्यासाठी पायलट प्रोजक्टही सुरू करण्यात आला आहे. वाहनामधून होणारं कार्बन प्रदूषण कमी करण्यासाठी शाश्वत इंधन निर्मितीवर कंपनीकडून काम करण्यात येत आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेण वापरण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात शेणखताला डिमांड वाढू शकते. मारुती सुझुकी ही भारतातील आघाडीची कार निर्मिती कंपनी असून कंपनीचा कार विक्रीतील वाटा सुमारे 50 टक्के आहे. त्यामुळे मारुतीच्या गाड्या भविष्यात बायोगॅसवर पाहायला मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको.
मारुती सुझुकी शेणापासून बायोगॅस निर्मिती करणार( Maruti Suzuki will make biogas from cow dung)
शेणापासून बायोगॅस निर्मितीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मारुती सुझुकीने काम सुरू केले आहे. सीएनजी आणि इथेनॉलवर आधारित कार्बन न्युट्रल कंम्बशन इंजिनवरमध्ये शेणापासून तयार केलेला बायोगॅस वापरण्यात येणार आहे. कंपनीने नुकतेच growth strategy for 2030 असे एक प्रेझेंटेशन सादर केले. फक्त इलेक्ट्रिक बॅटरीआधारित गाड्या नाही तर सीएनजी, बायोगॅस आणि इथेनॉल मिक्स इंधनावरील गाड्याही कंपन्या भविष्यात तयार करणार आहे, असे कंपनीने सांगितले.
ग्रामीण भागातील शेणाची उपलब्धता( cow dung availability in rural India)
पशूपालन व्यवसाय भारतामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे शेणाची सर्वात जास्त उपलब्धता ग्रामीण भागात असते. त्यामुळे या भागात बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येतील, आणि त्याचा पुरवठा विविध भागांत केला जाईल. मारुतीच्या सीएनजी गाड्यांमध्ये शेणापासून तयार केलेला बायोगॅस 70% पर्यंत वापरला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. फक्त भारतातच नाही तर जपान, आशिया आणि आफ्रिका खंडातही असे प्रकल्प सुरू करण्यात येतील, असे म्हटले आहे.
डेअरी डेव्हलपमेंट बोर्डासोबत करार- National Dairy Development Board (NDDB)
मारुतीने मागील वर्षी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डासोबत मागील वर्षी सामंजस्य करार केला आहे. याद्वारे पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. तर भविष्यात इतर दूध उत्पादक संघांसोबतही करार करण्यात येणार आहे. जपानमध्ये कंपनीने अशा पद्धतीचा एक प्रकल्प सुरू केला आहे. भारतातील विविध दूध संघांची मदत घेऊन कंपनी शेणापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरू करणार आहे. सोबतच 2023 पासून पुढे दरवर्षी एक इलेक्ट्रिक कार निर्मिती करणार आहे.