ICICI Videocon Loan Scam: आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज फसवणुकी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने व्हिडिओकॉन समूहाच्या वेणुगोपाल धूत यांना अटक केली. यापूर्वी आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर सुमारे तीन दिवसांनी धूत यांना मुंबईतून अटक करण्यात आली. धूत आणि कोचर यांच्या अटकेनंतर आयसीआयसीआय आणि व्हिडिओकॉनमधील स्कॅम आपल्यासमोर येऊ लागला आहे. चला तर मग आजच्या मार्केट स्कॅम (Market Scam) या सदरात आयसीआयसीआय आणि व्हिडिओकॉन यांच्या स्कॅममध्ये नक्की काय झाले होते, हे जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
2019 मध्ये पहिली FIR दाखल
कोचर दाम्पत्य, वेणुगोपाल धूत आणि नुपॉवर रिन्युएबल्स (NRL), सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांवर गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपाखाली 2019 मध्ये FIR नोंदवण्यात आली होती. या केसबाबत CBI ने दावा केला आहे की, ICICI बँकेने बँकिंग नियमन कायदा, RBI मार्गदर्शक तत्त्वे आणि बँकेच्या पत धोरणाचे उल्लंघन करून वेणुगोपाल धूत यांनी प्रमोट केलेल्या व्हिडिओकॉन ग्रुपच्या कंपन्यांना एकूण 3,250 कोटींची क्रेडिट सुविधा दिली होती. तसेच FIR मध्ये नमूद केल्यानुसार, धूत यांनी सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (supreme energy private limited-SEPL) मार्फत न्यूपॉवर रिन्युएबल्स (New Power Renewables) मध्ये 64 कोटींची गुंतवणूक केली होती. दरम्यान 2010 ते 2012 या दरम्यान दीपक कोचर यांनी मॅनेज केलेल्या पिनॅकल एनर्जी ट्रस्टकडे सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (SEPL) हस्तांतरित केली. अशाप्रकारे दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांनी न्यूपॉवर आणि सुप्रीम एनर्जीची मालकी चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित केली होती.
चंदा कोचर यांचा या प्रकरणाशी संबंध कसा?
भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर, चंदा कोचर यांना 2019 मध्ये ICICI बँकेच्या CEO पदावरून काढून टाकण्यात आले. यापूर्वी, ED अधिकाऱ्यांनी असा दावा केला होता की, कोचर यांनी बँकेच्या कर्ज धोरणांचे उल्लंघन करून व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजला कर्ज मंजूर केले होते. त्या बदल्यात व्हिडिओकॉनच्या मालकाने दीपक कोचर यांच्या NuPower Renewables मध्ये गुंतवणूक केली होती.
सीबीआयला असे आढळून आले की, व्हिडिओकॉन समूह आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांना जून 2009 ते ऑक्टोबर 2011 या दरम्यान ICICI बँकेकडून नियमांना बगल देत एकूण 1,875 कोटींची सहा कर्जे मंजूर करण्यात आली होती. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 2012 मध्ये ही कर्जे नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (NPAs) म्हणून घोषित करण्यात आली होती. परिणामी बॅंकेचे 1,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. अशा आरोपांमुळे सीबीआय (Central Bureau of Investigation-CBI), अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate-ED) आणि गंभीर फसवणूक तपास कार्यालय (Serious Fraud Investigation Office -SFIO) यासह अनेक एजन्सींनी खोलवर तपास करण्यास सुरुवात केली.
चंदा कोचर सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
आयसीआयसीआय बॅंकेतील या कर्ज फसवणूक प्रकरणाने 2019 मध्ये अनेकांना आश्चर्यचकित केले. 59 वर्षीय चंदा कोचर यांना 2011 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. फोर्ब्स इंटरनॅशनलच्या 'जगातील सर्वात 100 शक्तिशाली महिला' यादीत सलग सात वर्षे तसेच टाईम मासिकाच्या 2015 मधील जागतिक यादीत '100 प्रभावशाली व्यक्ती' यामध्येही त्यांचे नाव होते.
1,875 कोटी रुपयांची सहा कर्जे मंजूर
व्हिडिओकॉन समुहाला ICICI बँकेकडून 3,250 कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्याच्या काही आठवड्यानंतर दीपक कोचर यांच्या NuPower Renewables कंपनीला वेणुगोपाल धूत यांच्या एका कंपनीकडून फुल्ली कनव्हर्टीबल डिबेंचर (FCDs) द्वारे 64 कोटी रुपये पाठवण्यात आले. चंदा कोचर यांच्या 2009 ते 2011 या कालावधीत ICICI बँकेत असताना, व्हिडिओकॉन समूह आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांसाठी एकूण 1,875 कोटी रुपयांची सहा कर्जे मंजूर करण्यात आली होती.
ICICI बॅंकेचा 1,730 कोटी रुपयांचा तोटा
2019 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने कोचर दाम्पत्य, धूत आणि इतरांवर मनी लाँड्रिंगचा आरोप लावला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेणुगोपाल धूत यांनी सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (SEPL) मार्फत 64 कोटी रुपये Nupower Renewables मध्ये गुंतवले आणि SEPL व्यवस्थापित पिनॅकल एनर्जी ट्रस्टकडे हस्तांतरित केले. दीपक कोचर यांनी अप्रत्यक्ष मार्गाने, आणि चंदा कोचर यांच्या कार्यकाळात घेतलेली बहुतेक कर्जे बुडित गेली. परिणामी बँकेला 1,730 कोटी रुपयांचा तोटा झाला.
चंदा कोचर आयसीआयसीआयमध्ये 1984 पासून कार्यरत
चंदा कोचर 1984 मध्ये ICICI बँकेत रुजू झाल्या आणि 2009 मध्ये व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO बनल्या. 2018 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याच्या घोषणेनंतर, 4 ऑक्टोबर 2018 रोजी देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेचा शेअर जवळपास 6% वाढून 320 रुपयांवर पोहोचला. 28 जानेवारी 2019 रोजी, ICICI बँकेचे शेअर्स 4% घसरून 341.65 रुपयांवर आले. चंदा कोचर, दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 23 डिसेंबर 2022 रोजी शेअर मार्केटवर याचे परिणाम देखील दिसून आले.
चंदा कोचर, दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांची कसून चौकशी सुरू असून लवकरच त्याचे निकाल सर्वांसमोर येतील.