Market Opening Bell: भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात आठवड्याच्या पहिल्या दिवशी नकारात्मक झाली. सकाळी बाजार सुरू होताच प्रमुख निर्देशांकात पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 59,671.34 अंकांवर ट्रेड करत आहे. 600 पेक्षा जास्त अंकांनी सेन्सेक्स खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 17,634 पर्यंत खाली आला. गुरुवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसने तिमाही निकाल जाहीर केले. त्यानंतर आज बाजार सुरू झाल्यानंतर इन्फोसिसचे शेअर्स 10 टक्क्यांनी खाली आले.
जागतिक घडामोडींचा भारतीय बाजारावर परिणाम
आशिया खंडातील प्रमुख बाजारांतील पडझडीचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे. सिंगापूर एक्सचेंज 90 अंकांनी खाली आला. तर जपानचा निक्केई निर्देशांक 225 अंकांनी कोसळला. तसेच दक्षिण कोरिया, चीनचा शेअर बाजाराही खाली आला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांकही लाल रंगात ट्रेड करत होता. सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 5 पैशांनी कमी झाला.
सकाळच्या सत्रातील टॉप लूझर्स
इन्फोसिस आयटी कंपनीचा शेअर्स 10 टक्क्यांनी खाली आला असून सध्या शेअर्सची किंमत 1219.95 इतकी आहे. LTIMindtree Ltd कंपनीचा शेअर्स 8% खाली आला. परसिस्टंट, टेक महिंद्रा, झेन्सार, एचसीएल, इन्फो एज, एम्फसीस कंपनीचे शेअर्सही खाली आले आहेत. आयटी निफ्टीला मोठा फटका बसला आहे. गुरुवारी इन्फोसिस कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले. मात्र, विश्लेषकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार कंपनीचे निकाल आले नाहीत. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. शुक्रवारी सुट्टी असल्याने सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर भांडवली बाजार सुरू झाला. आज सोमवारी बाजार सुरू होताच इन्फोसिसचा शेअर गडगडला. दरम्यान, झी एंटरटेंन्मेंट, TV18 ब्रॉडकास्ट, टाटा स्टील, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया शेअर्स वधारले आहेत.
भारतीय भांडवली बाजार मागील आठ दिवसांपासून हिरव्या रंगात ट्रेड करत होता. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक सतत प्रगती करत होते. मात्र, तिमाहीचे निकाल जाहीर होऊ लागल्यापासून बाजारात उलथापालथ होत आहे. टीसीएस कंपनीचे निकाल सकारात्मक आले असतानाही दुसऱ्याच दिवशी कंपनीचे शेअर्स खाली आले. अमेरिकेतील भाववाढीच्या आकडेवारीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी फेडरल रिझर्व्ह बँकेची तिमाही बैठक आहे. जर फेडने दरवाढ केली तर त्याचा नकारात्मक परिणाम संपूर्ण जगभरातील भांडवली बाजारांवर दिसून येईल. दरम्यान, भारतातही महागाई पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. मात्र, व्याजदरवाढीला तूर्तास ब्रेक लागला आहे.