भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात आज (शुक्रवार) सकारात्मक झाली. सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला तर निफ्टी निर्देशांक 17650 अंकांवर ट्रेड करत आहे. दोन्ही प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत आहेत. सध्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्याचा हंगाम सुरू आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कंपन्यांचे अपवाद वगळता सुमार कामगिरीची आकडेवारी समोर येत आहे. तर बँकांचे निकाल सकारात्मक येत असून पुढील काळात चांगल्या वाढीचे संकेत मिळत आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 100 अंकांनी वधारून 59714.36 वर ट्रेड करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 17650 वर ट्रेड करत आहे. किंचित वाढजरी असली तरी निफ्टी हिरव्या रंगात ट्रेड करत आहे, ही बाजारासाठी सकारात्मक बाब आहे. बँक निफ्टी 42350 अंकांच्या पुढे आहे तर आयटी निफ्टीही प्रगती दर्शवत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया तीन पैशांनी वधारला.
कोणते शेअर्स वर गेले? कोणते खाली आले?
निफ्टी निर्देशांकावरील एचसीएल टेक, युपीएल, डिव्हिस लँब, एचडीएफसी लाइफ, कोटक बँकचे शेअर्स वधारले. तर टेक महिंद्रा, आयशर मोटर्स, टाटा स्टील, जेएसडब्लू स्टी, टाटा मोटर्सचे शेअर्स खाली आले.
मध्यम आकाराच्या IT कंपन्यांकडून अपेक्षा
HCL या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने गुरुवारी तिमाही निकाल जाहीर केले. त्यानंतर आज कंपनीच्या शेअरचा भाव सुमारे 16 टक्क्यांनी वाढून 1053.85 वर ट्रेड करत आहे. काही बलाढ्य आयटी कंपन्यांनी मोठा नफा नोंदवला नसला तरी मध्यम आकाराच्या आयटी कंपन्या चांगली कामगिरी करू शकतात, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. जागतिक स्तरावरील परिस्थितीचा थोडाफार परिणाम आयटी क्षेत्रावर होऊ शकतो. मात्र, बँकांची घोडदौड सुरूच आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज, ICICI बँक तिमाही निकाल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिमाही निकाल आज जाहीर होणार आहेत. त्याकडेही भांडवली बाजाराचे आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तर ICICI Bank तिमाही निकाल उद्या जाहीर होणार आहे. बँकांची कामगिरी चांगली होत असल्याचे आतापर्यंत समोर आलेल्या निकालावरून दिसते. कर्ज वितरणाची आकडेवारी वाढतच असून बँका सुस्थितीत दिसत आहेत. निकालाच्या पाश्वभूमीवर आज रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर खाली आला होता. मात्र, आता पुन्हा स्थिर झाला आहे.