Market opening Bell: भांडवली बाजारात काल (सोमवारी) तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 400 अंकांच्याही वर गेला होता. मात्र, आज (मंगळवार) सकाळी बाजार सुरू होताच निर्देशांक खाली आले. निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक किंचित खाली आले असून लाल रंगात ट्रेड करत आहेत. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 32 अंकांनी खाली येऊन 60,023 वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 16 अंकांनी खाली येऊन 17,725.30 वर ट्रेड करत आहे. कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत आहे, त्यामुळे बाजारात चढउतार होत आहेत.
सकाळच्या सत्रात चर्चेतील शेअर्स कोणते?
रेल विकास निगम लिमिटेड, फ्युचर कन्झ्युमर लिमिटेड, बजाज फेनसर्व्ह, हिरो मोटो कॉर्पो, इंडसंड बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियाबुल्स रिअल इस्टेट, अॅक्सिस बँकेचे शेअर्स वधारले. तर येस बँक, क्रॉमप्टन ग्रेव्हिस इलेक्ट्रिक, टाटा टेलिसर्व्हिसेस, एशिएन पेंट्स, टेक महिंद्रा, एचडीएफसी लाइफ, कोटक बँक, डॉ. रेड्डी लॅबोरेटरी या कंपन्यांचे शअर्स खाली आले.
चालू आठवड्यात मोठ्या घडामोडींची शक्यता?
भारतीय भांडवली बाजार मागील काही दिवसांपासून प्रगती करत आहे. खूप मोठी पडझड झाली नाही. मात्र, चालू आठवड्यात बाजारात हालचाल होऊ शकते. कारण, या आठवड्यात अमेरिकेतील विकासदर आणि महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. तसेच अमेरिकेतील बलाढ्य कॉर्पोरेट कंपन्या तिमाही निकाल जाहीर करणार आहे. जर ही आकडेवारी नकारात्मक आली तर त्याचा परिणाम भारतीय भांडवली बाजारावर होऊ शकतो. पुढील महिन्यात युएस फेडरल बँक व्याजदर वाढ करणार की नाही? यावरही बाजार अवलंबून आहे. त्यामुळे आतापर्यंत भारतीय शेअर मार्केटमध्ये प्रगती दिसून येत असली तर पुढील काही दिवसात मोठ्या घडामोडी होऊ शकतात.
डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी वाढून 81.87 झाला. काल इंडसंड बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पर्सिस्टंट सिस्टिम या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले. जगभरातील मंदीसदृश्य परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नाही. भाववाढीचा परिणाम अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांवर दिसून येत आहे. जागतिक स्तरावरील पुरवठा साखळीत निर्माण झालेला अडथळा अद्याप गेलेला नाही.