Market Master Vijay Kedia: विजय केडिया हे मुंबईतील एक प्रसिद्ध भारतीय स्टॉक गुंतवणूकदार आहेत. ते ‘केडिया सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड’ चे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 800 कोटींहून अधिक आहे. विजय केडिया हे सध्याच्या काळातील सर्वात यशस्वी शेअर गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांचा शेअर बाजारातील प्रवास अनेक जुन्या आणि नवीन गुंतवणूकदारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. केडिया वयाच्या 19व्या वर्षापासून शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिंग करत आहेत. इकॉनॉमिक टाइम्सनुसार त्यांना 'मार्केट मास्टर' म्हणून संबोधले. चला तर मग आजच्या मार्केट बुल्स(Market Bull)मध्ये विजय केडिया हे भारतातील सर्वात यशस्वी स्टॉक गुंतवणूकदार कसे बनले हे जाणून घेऊ.
विजय केडिया यांचे सुरूवातीचे आयुष्य!
विजय केडिया यांचा जन्म स्टॉक ब्रोकर्सच्या कुटुंबातच झाला. त्यांच्या कुटुंबात अनेक वर्षांपासून शेअर मार्केट आणि ब्रोकर्सशी संबंधित व्यवसाय केला जात आहे. विजय यांच्या वडिलांच्या निधनानंतर वयाच्या 19 व्या वर्षीच ते स्टॉक ब्रोकरेजच्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले आणि ते स्टॉक ब्रोकर म्हणून काम करू लागले. पण काही वर्षांनी विजय यांनी आपले व्यवसायातील करिअर सुरू करण्यासाठी स्टॉक ब्रोकिंग सोडले. पण कालांतराने त्यांच्या लक्षात आले की, नफा मिळवूनही, काही मोठ्या तोट्यामुळे त्याचा नफा एकाएकी कमी होत आहे. त्यामुळे विजय यांनी ट्रेडिंगबरोबर शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास सुरुवात केली.
शेअर मार्केटमधील विजय केडिया यांचे करिअर
विजय केडिया हे कोलकात्यात असताना त्यांनी 'पंजाब ट्रॅक्टर'चा 50 रुपयांचा शेअर घेतला होता. तो शेअर फक्त 3 वर्षात 10 पटीने वाढला. पण त्यांनी यामध्ये कमी पैसे गुंतवल्याने त्यांना भरपूर फायदा मिळवता आला नाही. 1992-93 मध्ये त्यांनी ACC कंपनीचा शेअर 300 रुपयांना घेतला होता आणि दीड वर्षात सुमारे ते 3 हजार रुपयांना विकला गेला. या नफ्यातून त्यांनी मुंबईत आपले पहिले घर घेतले. या ट्रेडिंगमधून विजय केडिया यांना प्रोत्साहन मिळाले आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. हळुहळू त्यांनी अनेक मल्टी-बॅगर स्टॉक्स निवडले. ज्यामुळे त्यांना पुढील 10-12 वर्षांमध्ये 1 हजार टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवता आले.
अशाचप्रकारे एजिस लॉजिस्टिक्सचा स्टॉक त्यांनी 20 रुपयांना घेतला आणि त्याच कंपनीमध्ये त्यांनी 5% हिस्सा खरेदी केला. 2012 मध्ये विजय केडिया यांनी भारतात बुल रन सुरू होण्याचा अचूक अंदाज वर्तवला होता. जेव्हा इतर गुंतवणूकदार बेअरची वाट बघत होते. हा केडिया आणि इतर गुंतवणूकदारांमध्ये फरक आहे. म्हणूनच त्यांना ‘मार्केट मास्टर’ (Market Master) म्हटले जाते.
विजय केडिया यांचा मार्केट मंत्रा
विजय यांच्या मते गुंतवणूकदारामध्ये ज्ञान, धैर्य आणि संयम हे तीन गुण असणे आवश्यक आहे. ट्रेडिंगमध्ये सुरुवातीच्या काळात झालेल्या नुकसानीनंतर, विजय यांनी लॉन्ग टर्म स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यावर भर दिला. ते गुंतवणुकीबाबत नेहमी सांगतात की, “फक्त लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करा. किमान कालावधी पाच वर्षे असला पाहिजे: रोम एका दिवसात बांधला गेला नाही. एखादी कथा परिपक्व होण्यासाठी तिला वेळ लागतो. मी नेहमी स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करतो जी पुढे मिड टू लार्ज कॅप बनते."
याशिवाय, विजय केडिया गुंतवणुकीसाठी स्टॉक निवडताना कंपनीच्या व्यवस्थापनालाही खूप महत्त्व देतात. कंपनीतील व्यवस्थापनाच्या भूमिकेबाबत विजय केडिया सांगतात की, “मॅनेजमेंट, व्यवसाय वाढ आणि नकारात्मक रिस्क समजून घेणे या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत; ज्या मी कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यापूर्वी शोधतो. माझा विश्वास आहे की, एखादा चांगला व्यवसाय चुकीच्या व्यवस्थापनामुळे उद्ध्वस्त केला जाऊ शकतो. सर्वोत्तम मॅनेजमेंटने नुकसानीत गेलेल्या व्यवसायांचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकते. जर मॅनेजमेंट अनुभवी, आक्रमक, पारदर्शक आणि त्याच्या व्यवसायासाठी केंद्रीत असेल, तर तुमच्या गुंतवणुकीत त्याचा फायदा नक्की होतो."
विजय केडिया यांची यशोगाथा भारतीय शेअर मार्केटमधील त्या सर्व गुंतवणूकदारांसाठी प्रेरणादायी आहे; ज्यांना शेअर्समधून चांगला नफा मिळवायचा आहे. त्यांचा हा मार्केट मंत्र प्रत्येक नव्या-जुन्या गुंतवणूकदारांसाठी उपयोगी ठरणारा आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            