Market Closing Bell: भारतीय भांडवली बाजारात आज (बुधवार) तेजी पाहायला मिळाली. कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालाच्या आकडेवारीचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात 235 अंकांची वाढ होऊन 60392 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 95 अंकांनी वाढून 17817 वर बंद झाला. सकाळच्या सत्रात बाजार स्थिर होता. मात्र, तिमाही निकालाची आकडेवारी जाहीर होऊ लागताच बाजाराने गती पकडली.
आयटी आणि बँक निफ्टी तेजीत
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा निर्देशांक IT निफ्टी वधारला. तर टाटा कन्सलटंसी कंपनीचा शेअर्सही 1.5% नी वधारला. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये टीसीएसचा शेअर्स 3,260.95 पर्यंत पोहचला होता. सोबतच बँक निफ्टी निर्देशांमध्येही तेजी दिसून आली. बँकांच्या कर्ज वितरणाची आकडेवारी सकारात्मक आल्यापासून बँकांचे शेअर्स वधारले आहेत. बँक निफ्टी 41,500 अंकांवर पोहचला.
तिमाहीची आकडेवारी जाहीर होईपर्यंत गुंतवणूकदार सावध पवित्रा घेताना दिसत होते. मात्र, काही काळात बाजारात तेजी दिसू लागली. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आयटी कंपन्यांचा नफा रोडावला होता. आयटी क्षेत्रात मंदी दिसून आली होती. मात्र, चौथ्या तिमाहीत नफ्याची आकडेवारी चांगली येत असल्याने बाजार आणखी वर जाण्याची चिन्हे आहेत. बँक निफ्टी पुढील काही दिवसांत 41,800-42,000 अंकांदरम्यान पोहचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
साखर आणि इथेनॉल उत्पादक कंपन्यांना डिमांड
जागतिक स्तरावर साखरेचे दर गेल्या 11 वर्षात सर्वाधिक वाढले आहेत. तसेच साखर कारखान्यातून निर्मिती होणारे इथेनॉलची मागणीही वाढत आहे. इंधन आणि इतर अनेक इंडस्ट्रीयल वापरासाठी इथेनॉलची उन्हाळ्यातील मागणी वाढली आहे. त्यामुळे जे कारखाने साखर आणि इथेनॉलचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात, त्यांच्या शेअर्सचे भाव येत्या काही दिवसांत आणखी वाढू शकतात.
अमेरिकेतील अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊ शकतो. अमेरिकेतील महागाईची आकडेवारी एप्रिल महिन्यात जाहीर होणार आहे. त्यावरून फेडरल बँक दरवाढ करणार की नाही हे स्पष्ट होईल. जर फेडरल बँकेने दरवाढ केली तर त्याचे नकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसून येतील. दरम्यान, अमेरिकेत रोजगाराच्या संधी वाढत असून कंपन्यांकडून नोकरभरती सुरू असल्याचा अहवाल जाहीर झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.