Market Closing Bell: आज दिवसभर भारतीय भांडवली बाजारात तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा पुन्हा पार केला. मागील काही दिवसांपासून बाजार दोलनामय स्थितीत होता. मात्र, आज दिवसभर बाजारात सकारात्मक वातावरण होते. 13 पैकी 7 निर्देशांक आज वधारले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 400 अंकांनी वाढून 60,056 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 119 अंकांनी वाढून 17,743.40 वर बंद झाला.
टाटा कन्झ्युमर, टायटन, एचडीएफसी लाइफ, विप्रो, हिरो मोटो कॉर्प आणि अपोलो हॉस्पिटल शेअर्स भाव आज वधारले. तर डॉ. रेड्डी, सन फार्मा, सिप्ला, युपीएल आणि डिव्हिस लॅबचे शेअर्स ढासळले. बँक निफ्टी आज 517.75 अंकांनी वधारून 42,635.75 वर स्थिरावला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आज दिवसभरात मोठी मागणी होती. जय श्रीराम मल्टी टेक, स्टारट्रेक फायनान्स, NGL Fine-chem, शंकरा बिल्डिंग प्रॉडक्ट्स आणि Shree Vasu Logistics या कंपन्यांचे शेअर्स वधारले.
52 आठवड्यांच्या उच्चांकावरील शेअर्स
Wendt (India), बजाज ऑटो, पॉवर मेक प्रोजेक्ट्स, लुमॅक्स इंडस्ट्रीज, Cyient, गोदरेज कन्झ्युमर, जेबीएम ऑटो, सुर्या रोशनी, कसोल्व्स इंडिया, हरिओम पाईप्स, झायडस लाइफ सायन्स, आयटीसी, रेल विकास निगम सह 40 स्टॉक्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचले.
तिमाही निकालाची आकडेवारी
दरम्यान, इंडसंड बँकेने आज तिमाही निकाल जाहीर केले. चौथ्या तिमाहीत बँकेला 2,040 कोटी रुपयांचा नफा झाला. हा तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी जास्त आहे. मागील वर्षी चौथ्या तिमाहीत कंपनीला 1,361 कोटी रुपये नफा झाला होता. 2022-23 सालासाठी बँकेच्या संचालक मंडळाने 14 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रला मागील वर्षाच्या तुलनेत 136% जास्त नफा झाला. चौथ्या तिमाहीत बँकेला 840 कोटी रुपये नफा झाला. तसेच कंपनीचे नॉन परफॉर्मिंग अॅसेट्सचे (NPA) प्रमाण 2.94% वरुन 2.47% इतके कमी झाले. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला फक्त 355 कोटी रुपये नफा झाला.
जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. वाढते व्याजदर, अस्थिर जागतिक अर्थव्यवस्था आणि मागणी पुरवठ्यातील तफावत यामुळे तेलाच्या किंमती खाली आल्या आहेत. आज दिवसभरात फार्मा, मीडिया क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स खाली आले.