तुम्ही D'Mart मध्ये महिन्यातून किती वेळा जाता? घरातले सामान भरायचे असेल किंवा कपडे घ्यायचे असतील किंवा कोणाला गिफ्ट घ्यायचे असेल, सर्वसामान्य कुटुंबांचा सर्वांत पहिला पर्याय हा D'Mart हाच असतो. सध्या D'Mart सर्वसामान्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनले आहे. D'Mart सारखी रिटेल चैन भारतात सुरू करणारे राधाकिशन दमाणी (Radhakishan Damani) यांचे आभारच मानले पाहिजेत. त्यांनीच भारतात D'Mart सारखी रिटेल सुपरमार्केट चैनची सुरुवात केली आणि आज प्रत्येक घरातील व्यक्ती आठवड्यातून एकदा तरी D'Mart चे दर्शन घेतोच. राधाकिशन दमाणी हे सुरुवातीपासूनच बिजनेसमॅन (Businessman) नव्हते. दमाणी हे बिजनेसमॅन होण्याआधी एक ट्रेडर (Trader) होते, ते साधेसुधे ट्रेडर नव्हते. दलाल स्ट्रीटवर राज्य करणाऱ्या दमानींनी हर्षद मेहता यांनी केलेल्या घोटाळ्यादरम्यान सुद्धा मोठा फायदा मिळवून ‘मी काय करू शकतो’ हे मार्केटला दाखवून दिले होते. मार्केटमधल्या अशा सुपरस्टार प्लेअरने शेअर मार्केटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर रिटेल मार्केटमधेही धुमाकूळ घातला. आज राधाकिशन दमाणी यांना “दि रिटेल किंग ऑफ इंडिया” (The Retail King of India) असे म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊयात आजचे मार्केट बुल्स (Market Bulls); राधाकिशन दमाणी आणि कसा होता त्यांचा किंग ऑफ शेअर मार्केट ते किंग ऑफ रिटेल मार्केट पर्यंतचा प्रवास.
Table of contents [Show]
कोण आहे राधाकिशन दमाणी?
राधाकिशन दमाणी यांचा जन्म मुंबईतील मारवाडी परिवारात एका छोट्याशा घरात झाला. त्यांनी कॉमर्समधून ग्रॅज्युएशन करण्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतले. पण पहिल्याच वर्षात यांनी कॉलेजला राम राम केला. त्यांचे वडील शिवकिशनजी दमाणी हे शेअर मार्केट ब्रोकर होते. कॉलेज सोडल्यानंतर राधाकिशन यांनी स्वतःचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय सुरु केला. पण वडिलांच्या अचानक झालेल्या निधनानंतर त्यांना त्यांचा व्यवसाय बंद करून शेअर मार्केटमध्ये ब्रोकर म्हणून उतरावे लागले. इथूनच त्यांच्या शेअर मार्केटमधल्या प्रवासाला सुरुवात झाली.
Triple-R ग्रुप आणि शेअर मार्केटची सुरुवात!
1980 पर्यंत राधाकिशन दमाणी यांचे मार्केटमध्ये एवढे नाव नव्हते. पण Triple-R ग्रुपमुळे त्यांचे नाव संपूर्ण मार्केटमध्ये पसरू लागले. या ग्रुपमध्ये दमाणी, राजू आणि बिग बुल राकेश झुनझुनवाला (Big Bull Rakesh Jhunjhunwala) हे होते. Triple-R ग्रुप त्यावेळी मार्केटमधील स्टॉक शॉर्ट करून फायदा मिळवायचे. त्यांचे सर्वांत आवडीचे शत्रू हर्षद मेहता होते. हर्षद मेहता आणि दमाणी यांच्यात पहिले युद्ध अपोलो टायर्सच्या (Apollo Tyres) स्टॉकवरून झाले होते. दमनींना वाटले की या स्टॉकची किंमत जरा जास्तच वर जात आहे. त्यामुळे त्यांनी स्टॉक शॉर्ट करण्यास सुरुवात केली. पण मेहतांनी बेकायदेशीर फंडिंगचा वापर करून स्टॉक मॅनीप्युलेट करण्यास सुरूवात केली. परिणामी दमाणी आणि Triple-R ग्रुपला मोठा आर्थिक फटका बसला होता.
ट्रेडरपासून बिझनेसमॅनच्या प्रवासास सुरूवात...
1992 मध्ये जेव्हा हर्षद मेहतांचा स्कॅम जगासमोर आला तेव्हा मार्केट प्रचंड कोसळले. जिथे ट्रेडर्स आपला पसारा आवरून मार्केटमधून काढता पाय घेत होते तिथे दमाणी आणि Triple-R ग्रुप मोठमोठे स्टॉक शॉर्ट करून मोठा फायदा मिळवत होते. दमाणी यांचे HDFC बँकेच्या स्टॉकवरचे प्रेम अपरंपार होते. बँकेने जेव्हा IPO (Initial Public Offering) फाईल केला तेव्हा दमानींनी 400 कोटी रुपयांचे शेअर्स 40 रुपये प्रति शेअर या भावाने विकत घेतले. 1995 मध्ये ते HDFC बँकेचे सर्वात मोठे शेअर होल्डर ठरले. शेअर मार्केटमध्ये सगळे सुरळीत चालू असतानाच त्यांनी सर्वात मोठा व महत्त्वाचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचा ट्रेडर पासून ते बिझनेसमॅन पर्यंतचा प्रवास सुरु झाला.
शेअर मार्केटला पूर्ण विराम!
राधाकिशन दमाणी यांनी 1999 मध्ये Apna Bazaar ची फ्रॅंचाईजी नेरुळ मध्ये सुरु केली होती. पण Apna Bazaar च्या बिझनेस मॉडेलमध्ये दमाणी खुश नव्हते. या बिझनेसला मोठं करणे अवघड होते. त्यात शेअर मार्केटमधील ट्रेडिंगमुळे दमाणींना अपना बझारच्या व्यवसायात लक्ष घालणे कठीण जात होते. त्यामुळे 2000 मध्ये दमाणी यांनी शेअर मार्केट सोडण्याचा निर्णय घेतला. शेअर मार्केटला पूर्ण विराम लावल्यानंतर त्यांनी आपल्या बिझनेसनचा नवीन अध्याय लिहिण्यास सुरुवात केली. 2002 मध्ये त्यांनी Avenue Supermarts या कंपनी अंतर्गत D’Mart या ब्रँडने पहिली शाखा पवईमध्ये सुरु केली. तिथून दमाणी यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली.
राधाकिशन दमाणी यांनी शेअर मार्केटमध्ये असताना भरपूर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. पण आता वेळ आली होती ती स्वतःची कंपनी सुरु करण्याची. रिटेल मार्केटमध्ये त्यावेळी अनेक कंपन्या होत्या. नवीन कंपन्यादेखील यात उतरत होत्या. पण दमाणी यांनी थेट या खेळात न उतरता बाहेरून खेळ बघण्याचे ठरवले. त्यांनी संपूर्ण मार्केटचा व ग्राहकांचा अभ्यास केला व अशा स्ट्रॅटेजी तयार केल्या. ज्याने रिटेल मार्केटदेखील दणाणून निघेल. अनेक कंपन्या स्टोअर्स लीज वर म्हणजेच भाड्याने घेत होती. पण D'Mart ने स्टोअर्स विकत घेण्याचा सपाटा लावला. D’Martची ही स्ट्रॅटेजी चांगलीच चालली. D'Mart वेळोवेळी मार्केटचा अभ्यास करून नवनवीन स्ट्रॅटेजी वापरल्या. परिणामी D'Mart आज एक यशस्वी आणि विश्वासू ब्रॅण्ड बनला.
2017 मध्ये D'Mart चा आयपीओ दाखल!
D'Mart च्या यशस्वी सुरुवातीनंतर 2017 मध्ये Avenue Supermarts ने IPO साठी फाईल केले होते. 299 रुपयांचा Avenue Supermarts चा स्टॉक आज 4 हजारांच्या आसपास आहे. Avenue Supermarts चे निव्वळ मूल्यांकन म्हणजेच नेट व्हॅल्युएशन 85 बिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 6,84,288 कोटी रुपये इतके आहे.
D’Mart हा फक्त आता एक ब्रॅण्ड राहिला नसून तो लोकांचा विश्वास बनला आहे. याचे सर्व श्रेय राधाकिशन दमाणी यांना जाते. राधाकिशन दमाणी 2021 मध्ये जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 98व्या क्रमांकावर होते. मुंबईतील एका लहान घरापासून ते जगातील श्रीमंतांच्या यादीतपर्यंतचा, तसेच शेअर मार्केटपासून ते एक यशस्वी व्यावसायिकापर्यंतचा प्रवास खडतर होता; पण त्यांनी तो शक्य करून दाखवला. राधाकिशन दमाणी यांच्यातील ट्रेडर आणि बिझनेसमॅन म्हणून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यांच्या या प्रवासातून प्रेरित होऊन अनेकांनी आपले प्रवास सुरु केले. भविष्यातही त्यांचा आदर्श कायम राहील.