Wild Vegetables : पावसाळाच्या मोहक वातावरणात आनंद घ्यायला मिळतो तो म्हणजे रानभाज्यांचा. पहिला पाऊस झाला की रानभाज्यांची आवक सुरू होते. रानभाजीची लागवड करावी लागत नाही, पावसाच्या पाण्याने त्याचे बीज वर येऊन आपोआप त्याचे रोप तयार होते. त्याच रानभाज्या विकून अनेक आदिवासी समाजाचे नागरिक पावसाळ्यामध्ये आपला उदरनिर्वाह करतात. शेताची राखण करण्यासाठी अनेक शेतकरी त्यांना गडी म्हणून ठेवतात. गडी म्हणून काम करणारे नागरिक हे वेगवेगळ्या राज्यातून आलेली असतात. त्यांना प्रति वर्ष असा मोबदला दिला जातो.
पण, पावसाळ्यामध्ये जर अति पाऊस झाला, काम बंद असले तर त्यांच्याकडे काहीच पैसे शिल्लक राहत नाही. अशा वेळी ते लोकं शेतातील भाज्या मार्केटमध्ये विकायला घेऊन जातात. प्रत्येकजण रानभाजीची वाट पाहत असतो त्यामुळे त्यांना भावही चांगला मिळतो. दरवर्षी हे लोकं न चुकता रान भाज्यांची विक्री करतात. जाणून घेऊया, भाज्यांचे दर किती?
कोणकोणत्या रानभाज्या मार्केटमध्ये आहेत?
आदिवासी समाजातील गडी म्हणून असलेले नागरिक जंगलातून रानभाज्या गोळा करुन विक्रीसाठी आणतात. यामध्ये कवळी, कोवळे बांबू, करटुले, कडूकंद, शेवळे, माठ, फांग, चाईचा मोहर, बोखरीचा मोहर, टेहरा, वाथरटे, रानकंद मोखा, वाघाटा, दिघवडी, भूईफोड, उळशाचा मोहर, अंबाडी, जिवतीची फुलं, कुंजर, आकऱ्या, उळसा, करटुले, आंबटवेल, कोळू, कांचन, दिंडा, रान ज्योत, भरडा, भारंग, माठभाजी, आळू, करडू, दिंड,या सर्व भाज्यांचा समावेश होतो.
आदिवासी समाजातील लोकांना रोजगार मिळतो
या भाज्यांमुळे आदिवासी समाजातील लोकांना पावसाळा भर रोजगार प्राप्त होतो. भाजी व्यवसायिकांशी चर्चा केली असता ते सांगतात की, इतर भाज्यांच्या तुलनेत रान भाज्यांची किंमत जास्त असते कारण त्या सिजनेबल असतात. पावसाळा सुरू झाला आणि पहिला पाऊस झाला की, अनेक लोकं या रानभाज्या घेऊन विक्रीसाठी येतात. काही लोकं स्वतः विकतात तर काही लोकं भाजी विक्रेत्याला विकतात. या भाज्यांमध्ये कोणतेही केमिकल वापरले जात नसल्याने अनेक ग्राहक या भाज्यांना पसंती देतात.
30 ते 50 रुपये जुडी मिळतो रानभाज्यांना दर
ग्रामीण भागातून शहरात आलेले लोकं या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात. त्यामुळे या भाज्या कितीही महाग असेल तरीही खरेदी केल्या जातात. भाज्यांचे दर आधीच वाढलेले आहेत. मेथीची मोठी जुडी 60 ते 70 रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर रान भाज्यांची लहान जुडी 30 ते 50 रुपयांना दिली जाते. या रान भाज्यांचे दर ठिकठिकाणी बदलत असल्याचे आढळून आले आहे. रानभाज्यांची विक्री जुडी किंवा किलोप्रमाणे होत आहे.