Wild Vegetables : पावसाळ्यामध्ये विदर्भातील चिखलदरा या ठिकाणासह अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. मेळघाटला विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. त्याच मेळघाटमध्ये आजही आपल्याला अनेक गोष्टी पुरातन काळातील बघायला मिळतात. तेथील लोकं जास्तीत जास्त भर हा नैसर्गिक अन्न प्रक्रियेवर देतात. चिखलदरा, मेळघाट प्रमाणेच विदर्भात पावसाळ्याच्या दिवसात जिवतीची फुलं देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. पावसाळा सुरू झाला की, 1 महिन्यामध्ये जिवतीची फुलं उमलतात. या फुलांचे आयुष्य जास्त नसते, यांचा कार्यकाळ हा 2 महिन्याचा असतो. त्यानंतर ही फुलं नाहीशी होतात. जाणून घेऊया, या फुलांचे वैशिष्टे आणि किंमत किती?
ग्रामीण भागात मोफत मिळणारी जिवतीची फुलं शहरात 50 रुपयाला पावशेर
जिवतीची फुलं ही एक रानभाजीचा प्रकार आहे. याच जिवतीच्या फुलांना दोडी, कुडाची फुलं देखील म्हणतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर 15 दिवसांनी याचा वेल शेतातील बांधावर किंवा काटेरी झुडपावर आपोआप उगवतो. त्यांतर 1 महिना या वेलाला फुलं येतात. ग्रामीण भागातील लोकं ही फुले शेतात जाऊन मोफत आणतात. कुठे वेल दिसला की त्याची फुले सहज तोडून घरी आणून त्याची भाजी बनवतात. पण शहरी भागात याच फुलांची किंमत 50 रुपयाला पावशेर अशी आहे.
शेतकरी आणि शेतातील गडी या भाज्यांची विक्री करतात
शेतात राहणारे गडी, शेतकरी ही फुले तोडून शहरात विकण्यासाठी आणतात. ही फुले काही एखाद्या व्यापारी घेऊन विकत नाही. शहरातील लोकांना या सर्व रानभाज्यांची नवलाई असते त्यामुळे मिळेल त्या दरात ते खरेदी करतात. जिवतीची फुलं ही दुर्मिळ असल्याने त्याची किंमत जास्त असल्याचे विदर्भातील शेतकरी सांगतात. जिवतीची फुलं संपूर्ण विदर्भातच आहे परंतु मेळघाटकडील भागात सर्वाधिक आढळतात. मार्केटमध्ये ज्या भाज्यांचे दर गगनाला भिडले असतात त्याच भाज्या शेतकरी ग्रामीण भागात मोफत आणतात.
रानभाज्यांचे 66 प्रकार आढळतात
जिवतीच्या फुलांप्रमाणेच मेळघाटमध्ये अशाच 66 राजभाज्यांचे प्रकार आढळतात. दीप अमावस्येच्या दिवशी जिवती मातेची पूजा केली जाते. त्या आधीच ही जिवतीची फुलं बाजारात दाखल झालेली असतात. त्यानंतर ही फूल नाहीशी होण्यास सुरवात होते. विदर्भातील लोकांची आवडती रानभाजी म्हणून जिवतीची फुलं ओळखली जातात. ग्रामीण भागातून शहराकडे आलेले लोकं जिवतीच्या फुलांची आतुरतेने वाट बघत असतात.