बहुचर्चित मॅनकाईंड फार्मा कंपनीचा आयपीओ 25 ते 27 एप्रिल या दरम्यान ओपन होणार असून 24 एप्रिलला अँकर गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करता येईल. आयपीओद्वारे मॅनकाईंड फार्मा कंपनी 4 कोटी इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. कंपनीतील प्रमुख भागीदार रमेश जुनेजा 37.1 लाख, राजीव जुनेजा 35.1 लाख, शीतल अरोरा 28 लाख, केर्नहिल CIPEF 1.74 कोटी, केर्नहिल सीजीपीई 26.2 लाख, बेज 99.6 लाख आणि इतर गुंतवणूकदार 50 हजार शेअर्सची विक्री करणार आहेत.
कोटक महिंद्रा कॅपिटल, जेफरीज, आयआयएफएल कॅपिटल, ॲक्सिस कॅपिटल आणि जेपी मॉर्गन हे या आयपीओचे प्रमुख व्यवस्थापक आहेत. तर शार्दुल अमरचंद मंगलदास, सिरिल अमरचंद मंगलदास, एझेडबी ॲण्ड पार्टनर्स आणि सिडले ऑस्टिन या कंपन्या कायदेशीर बाबी हाताळणार आहेत.
मॅनकाईंड फार्मा कंपनीच्या आयपीओची किंमत 1026-1080 रुपये या दरम्यान असून त्याचा 13 शेअर्सचा लॉट असणार आहे. एकूण इश्यूपैकी 50 टक्के हिस्सा हा पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyer-QIB), 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (Non-Instititional Investor-NII) आणि 35 टक्के हिस्सा हा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरक्षित आहे. या आयपीओच्या शेअर्सचे वाटप 3 मे रोजी केले जाणार आहे. त्यानंतर 8 मे रोजी त्याची एनएसई आणि बीएसईवर एन्ट्री होईल.
मॅनकाईंड फार्मा कंपनीचे प्रमुख उत्पादन
मॅनकाईंड फार्मा कंपनी देशभरात ॲण्टासिड पावडर (गॅस-ओ-फास्ट), व्हिटॅमिन आणि मिनरल सप्लिमेंट्स (हेल्थ ओके ब्रॅण्ड) आणि ॲटी- एक्ने क्रीम (ऍक्नेस्टार ब्रॅण्ड), कंडोम, गर्भधारणा चाचणी किट, आणि गर्भनिरोधक औषधे या उत्पादनांच्या विक्रीसाठी ओळखली जाते. ख्रिस कॅपिटल आणि कॅपिटल इंटरनॅशनल सारख्या खाजगी इक्विटी कंपन्यांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे.
ही फार्मा कंपनी रमेश जुनेजा यांनी 1991 साली सुरू केली होती. कंपनीच्या व्यवसायाबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीचे सर्वाधिक लक्ष हे देशांतर्गत बाजारपेठेवर आहे आणि आर्थिक वर्ष 2022 च्या निकालानुसार कंपनीला 97.60% महसूल हा देशांतर्गत मार्केटमधून मिळाला आहे.
Source: www.moneycontrol.com