Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Majhi Kanya Bhagyashree Yojana: 'माझी कन्या भाग्यश्री' योजना, मुलगी झाल्यास पालकांना मिळणार 50 हजार

Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून 1 ऑगस्ट 2017 पासून राज्यात 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेची अंमलबजावणी सुरू झाली.

मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांना चांगले शिक्षण देणे आणि राज्यात बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी मागील पाच महाराष्ट्र सरकारकडून माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली जाते. 'माझी कन्या भाग्यश्री' योजना 2022 नुसार आता मुलगी जन्माला आली तर राज्य सरकारकडून त्या मुलीच्या नावे बँक खात्यात 50000 रुपये जमा केले जाणार आहेत.

माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 अंतर्गत, आई-वडिलांमध्ये दुसरी मुलगी झाल्यानंतर कुटुंब नियोजनाचा निर्णय घेणाऱ्या पालकांसाठी दोन्ही मुलींच्या नावे 25000-25000 रुपये बँकेत जमा केले जाणार आहे. या योजनेत मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावरच मुदत ठेव रक्कम व त्यावरील जमा व्याजाची रक्कम काढता येणार आहे. मात्र त्यासाठी एक अट आहे. लाभार्थी मुलगी दहावी इयत्ता उत्तीर्ण आणि अविवाहित असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलेने दुसऱ्या प्रसुती वेळेस जुळ्या मुलींना जन्म दिला तर त्या दोन्ही जुळ्या मुली या योजनेसाठी पात्र असतील. बालगृहातील अनाथ मुली देखील सदर योजनेसाठी पात्र असतील, असे सरकारने म्हटलं आहे. 

माझी कन्या भाग्यश्री योजना 2022 या योजनेला पालकांचे आधार कार्ड लिंक करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची अचूक माहिती सरकारकडे असेल. मुदतीपूर्वी म्हणजेच मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले किंवा मुलगी दहावीत नापास झाली किंवा काही कारणामुळे मुलीचे नाव शाळेमधून काढून टाकण्यात आले लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे. 

या योजनेची वैशिष्ट्ये

  • एक मुलगी: 18 वर्षे कालावधीसाठी बँक खात्यात 50,000 रुपये
  • दोन मुली: प्रत्येक मुलीचे नावे बँक खात्यात 25 हजार रुपये
  • 7.5 लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेत सहभागी होता येईल 
  • लाभ घेण्यासाठी कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ
  • प्रत्येक सहा वर्षांनंतर कुटुंब जमा व्याज काढून घेऊ शकते
  • कुटुंबातील फक्त २ मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्ज करतेवेळी मुलीचे जन्म प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

या योजेनचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा

या योजनेचा  लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत/नगरपालिका / महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर अंगणवाडी सेविकेकडे या योजनेचा अर्ज सादर करावा.

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जासोबत वडीलांचा अधिवास दाखला आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र, 
  • दारिद्रय रेषेखालील असल्याचा पुरावा (रेशन कार्ड / उत्पन्नाचा दाखला)
  • लाभार्थी कुटुंबाने पहिल्या अपत्याच्या (मुलगी) जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • कुटुंब नियोजन शस्त्रकिया केली असल्याबाबतचे वैदयकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

एखाद्या कुटुंबात पहिले अपत्य मुलगी व दुसरे अपत्य मुलगी असेल आणि जर तिसरे अपत्य मुलगी झाली असेल तर त्या तिसऱ्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही उलट पहिल्या व दुसऱ्या मुलींना या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ रद्द करण्यात येईल.मुलगी दत्तक घेतली असेल तर ती मुलगी देखील सदर योजनेचा लाभ घेऊ शकेल परंतु दत्तक घेतलेल्या मुलीचे वय 0 ते 6 वर्षे इतके असावे तसेच दत्तक घेतलेल्या मुलीच्या पालकांना देखील सदर योजनेचे नियम व अटी लागू असतील. मुलीच्या कौशल्य विकासावर किमान 10000 रुपये खर्च करणे बंधनकारक आहे. या कौशल्याच्या मदतीने मुलीला रोजगार मिळू शकेल.