वृक्ष संगोपन-वृक्षारोपण, प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना, पाणी टंचाई भासू नये म्हणून, पाण्याचा अपव्यय टाळणे अशा छोट्या वाटणाऱ्या कृतीतून मोठा बदल घडू शकतो. त्यामुळे, पर्यावरणाची भविष्यातली पाण्याची गरज ओळखून कृषी क्षेत्रात आपण काय करू शकतो यावर अनेक संस्था काम करत आहेत. अशाच प्रकारे, पाणी, कृषी आणि तंत्रज्ञान या तिन्हींची सांगड घालून, ‘शेततळे निर्मिती’ या विषयाचे एका उद्योगात रूपांतर करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीची अर्थात मैथिली अप्पलवार यांची यशोगाथा...
एम्बी (EMMBI) इंडस्ट्रीज ही यंत्रमागावर विणल्या गेलेल्या पॉलिएथिलीन आणि पॉलिप्रोपिलीन निर्मितीमध्ये काम करते. याचा उपयोग कंटेनर लायनर्स किंवा कापड म्हणून, सिंचनाच्या अनेक पद्धतींमध्ये म्हणजे कालवे, शेततळी यामध्ये करण्यात येतो. या एम्बी इंडस्ट्रीजचे संस्थापक मकरंद अप्पलवार आणि रिंकू अप्पलवार या दांपत्याची मुलगी मैथिली. अमेरिकेतल्या अटलांटा मधल्या जॉर्जिया टेक विद्यापीठात ‘इंडस्ट्रियल इंजिनियरिंग’ विषयात पदवी शिक्षण तिने पूर्ण केले. आपल्याच कारखान्यात बनणाऱ्या पॉलिमरचा वापर करून आपण भारतातील शेतकऱ्यांसाठी काही करू शकतो का, असा विचार तिने केला. तेव्हा आपलं कोणतंही इनोव्हेशन हे मानवजातीच्या कल्याणासाठी असायला पाहिजे, हे तिने ठरवले. ऐन विशीत ‘शेततळे निर्मिती’ या क्षेत्रात तिच्या पुढाकाराने सुरू झालेल्या अवानाने चांगलीच मजल मारली आहे. आतापर्यंत 7,500 शेततळ्यांची निर्मिती अवाना (Avana)च्या माध्यमातून केली गेली आहे.
Table of contents [Show]
पाणी प्रश्नाबद्दल काय सांगाल?
माझं कुटुंब मूळचं विदर्भातलं असल्यामुळे तिकडे राहणाऱ्या नातेवाइकांकडून आणि अर्थातच बातम्यांमधून पावसाचं अनियमित प्रमाण, त्यावर अवलंबून असलेली शेती आणि कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबद्दल ऐकायला मिळायचं. शहरात राहणाऱ्या बहुसंख्य जनतेला ‘पाण्याविना शेतकरी’ या शब्दातील दाहकता कळत नाही. त्यामुळे, शेती या विषयात आपल्याला काही काम करायचं असेल तर पाणी हे एक मोठं आव्हानाचं क्षेत्र आहे, असा विचार करून मी या क्षेत्रात काम करायचं ठरवलं.
शेतीविषयक कामाचा अनुभव कसा मिळवला?
एम्बीच्या ‘अवाना’ या नव्या प्रोजेक्टची सुरुवात केली त्यावेळी एम्बी इंडस्ट्रीजलाही कंपनी म्हणून ग्रामीण भागात काम करायचा फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या अनेक संस्थांबरोबर अवानाने काम करायचं ठरवलं. या विषयातल्या अनेक वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन कामाची आखणी केली. शेततळ्यांची निर्मिती हे शेती आणि जलसंवर्धनाच्या विषयावर उत्तर होतंच; पण अवानाने व्यावसायिकपणे याकडे पाहायचं ठरवले.
शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी काय प्रयत्न केले?
जलदगतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शेततळ्यांद्वारे होणारी पाणीबचत आणि हमखास उपलब्ध होणारा पाणीसाठा यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, ही गोष्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून गावातल्या ग्रामसभेत आणि आठवडी बाजारात जिथे मोठ्या संख्येने शेतकरी जमतात तिथे आम्ही आमच्या अवानाच्या ‘जलसंचय’ या शास्त्रशुद्ध मापकांद्वारे बनवल्या जाणाऱ्या शेततळ्यांची माहिती द्यायला सुरुवात केली. शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक न करता प्रत्यक्ष त्यांच्या शेताची पाहणी करून, ते कोणतं पीक घेणार आहेत, त्या भागातील भौगोलिक परिस्थिती कशी आहे ते पाहून शेततळ्याच्या खर्चासाठी बँकेतून कर्ज मिळवून द्यायला साहाय्य केले. अभ्यास करून शेत तळ्याबाबत पर्याय सुचवले.
शेततळ्यासाठी येणारा खर्च कसा निश्चित केला जातो?
जिल्हा आणि तालुका पातळीवर भरणाऱ्या अनेक प्रदर्शनांत ‘अवाना’चा सहभाग असतो. शेततळं कसं असावं याचा नकाशा संगणकाच्या साहाय्याने अवानाची टीम तयार करते व त्याप्रमाणे शेततळ्यासाठी येणारा खर्च निश्चित केला जातो.
अवानाच्या माध्यमातून किती नागरिकांना रोजगार मिळाला आहे?
बँकेचं कर्ज, सरकारच्या उपलब्ध सबसिडी याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. शेततळ्याला कंपनीकडून पाच वर्षांची वॉरंटी असते. प्रत्यक्ष शेततळ्याच्या निर्मितीत मदत आणि पाण्याच्या संवर्धनासाठी जागृती यासाठी अवानाची ३०० जणांची टीम काम करते. आतापर्यंत ७,५०० शेततळ्यांची निर्मिती अवानाच्या माध्यमातून झाली आहे. जवळपास ४५,००० लोकांच्या आयुष्यावर याचा सकारात्मक परिणाम घडला आहे.
अवानाच्या प्रॉडक्टची वैशिष्ट्ये कोणती?
अवानाने शेततळ्याच्या प्रॉडक्टला ‘जलसंचय’ असे नाव दिले आहे. ‘जलसंचय’ आणि ‘जलसंचय सुपर’ असे दोन प्रकार शेततळ्याचे प्रॉडक्ट आहेत. जलसंचय सुपर हे एम्बी आणि अवानाने विविध प्रयोग करून तयार केलेले प्रॉडक्ट आहे. निळ्या रंगामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होते. अवानाच्या निळ्या कापडाच्या प्रयोगातून हे बाष्पीभवन जवळपास ५० टक्क्यांनी कमी होते. निळ्या रंगाच्या कापडामुळे त्यात शेवाळ्याची वाढ जास्त होते, जे मस्त्यशेतीला फायदेशीर असते. त्यामुळे मस्त्य शेतीसाठी सुद्धा याचा उपयोग शेतकरी करू शकतात. एम्बीमध्ये बनणाऱ्या मजबूत अशा पॉलिमर मटीरियलचा वापर करून पर्को प्लस आणि ॲक्वासेव्ह अशी दोन स्वतंत्र प्रॉडक्टही आहेत, ज्यांचा कॅनॉल्समधे वापर केला जातो.
यशस्वी उद्योजकाच्या यशाबद्दल काय सांगाल?
बिझनेसमधील यश ही एका झटक्यात होणारी गोष्ट नाही. चिकाटीने काम करत राहण्याची वृत्ती आणि मेहनत या दोन्ही शिवाय पर्यायच नाही. पाणी हा अनेक गोष्टींना व्यापून उरणारा सामाजिक प्रश्नच आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून त्याला उद्योगात रूपांतरित करून त्यावर उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. यातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. भारतातल्या तरुण पिढीने देशातल्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करायचं ठरवलं तर देश खऱ्या अर्थाने बदलेल.
स्त्रोत: यशस्वी उद्योजक