राज्य सरकारकडून यंदाच्या वर्षी देखील गोरगोरिबांना स्वस्तात शिधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षीच्या सण उत्सवासाठी सरकारच्या अन्न-धान्य पुरवठा विभागाकडून नागरिकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) दिला जाणार आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ऐन सणासुदीच्या काळात गोरगरिबांचा खर्चात बचत होणार आहे.
100 रुपयात आनंदाचा शिधा
सरकारने आनंदाचा शिधा या उप्रकमातंर्गत येणाऱ्या गौरी-गणपती आणि दिवाळी सणासाठी 100 रुपयात सणासाठी लागणारा आवश्यक अन्नधान्याचा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये रवा, हरभरा डाळ, साखर, खाद्यतेल असे प्रत्येकी एक किलो साहित्य दिले जाणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे गोर गरीब कुटुंबाची सणासुदीच्या काळात मोठी बचत होणार आहे. हा शिधा 19 सप्टेंबरचा गौरी-गणपती उत्सव आणि त्यानंतर 12 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणानिमित्ताने वितरित करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षीपासून सुरू केला उपक्रम
आनंदाचा शिधा उपक्रम गेल्यावर्षीही राबवण्यात आला होता. गेल्यावर्षी दिवाळी पूर्वी ऑक्टोबर महिन्यात आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यातील एकूण 1 कोटी 62 लाख 42 हजार रेशनकार्ड धारकांना या उपक्रमातंर्गत दिवाळी आणि त्यानंतर गुढीपाडवा, आंबेडकर जयंतीदिनी 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वितरीत करण्यात आला होता.
कोणाला मिळतो?
100 रुपयात आनंदाचा शिधा या उपक्रमातंर्गत आत्तापर्यत सरकारकडून अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, यासह एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील(ABL) केशरी रेशनकार्ड धारकांना हा शिधा वितरीत करण्यात आला होता. यावेळी या रेशनकार्ड धारकांना शिधा वितरीत करण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत राज्यातील एकूण 1,65,60,256 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. यासाठी राज्यसरकारडून 827 कोटी 35 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.