स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्य सरकारला मोठं यश मिळाले आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 137000 कोटींचे गुंतवणूक करार झाले आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी जागतिक पातळीवरील कंपन्यांनी दर्शवली आहे. तशा प्रकारे हजारो कोटींचे करार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितत मंगळवारी करण्यात आले.
महाराष्ट्रात आतापर्यंत 137000 कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंगळवारी 45520 कोटींचे करार करण्यात आले होते. यात अमेरिकन कंपनी न्यू इरा क्लिनटेक सोल्यूशन्स या कंपनीने 20000 कोटींचा करार केला आहे. ही कंपनी चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावरील प्रकल्प सुरु करणार आहे. या प्रकल्पाने स्थानिक पातळीवर जवळपास 15000 रोजगार संधी उपलब्ध होतील, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
ब्रिटनमधील वरद फेरो अलॉज या कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी येथे पोलाद प्रकल्प सुरु करण्याची तयारी दर्शवली आहे. कंपनीने दावोसमध्ये राज्य सरकारसोबत 1250 कोटींचा करार केला. इस्त्राईलमधील राजुरी स्टील अॅंड अलॉय कंपनीने चंद्रपूरमध्ये 600 कोटींचा पोलाद प्रकल्प सुरु करण्याचा करार केला असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्रात गोगोरा इंजिनिअरिंग आणि बडवे इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने 20000 कोटींचा ऑटो प्रोजेक्टसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याशिवाय पोर्तुगालमधील अलाईट प्लास या कंपनीकडून पुण्यातील पिंपरी येथे 400 कोटींचा प्रकल्प सुरु केला जाणार आहे. हा देखील करार दावोसमध्ये करण्यात आला.
दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडक देशांच्या पंतप्रधानांशी आणि उप पंतप्रधानांशी चर्चा करणार आहेत. महाराष्ट्र हे भारताचे औद्योगिक केंद्र आहे. देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 420 बिलियन डॉलर इतकी आहे. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा 14.2% वाटा आहे. औद्योगिक उत्पादनात राज्याचा 15% वाटा आहे. राज्यात 44 विशेष आर्थिक क्षेत्र असून 5 आंतरराष्ट्रीय आणि 13 देशांतर्गत विमानतळे आहेत. दोन मोठी आणि 53 छोटी बंदरे आहेत.
महाराष्ट्रासाठी होणार 20 करार
दावोसमधील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये महाराष्ट्रात जवळपास 1.4 लाख कोटींची थेट गुंतवणूक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित जवळपास 20 गुंतवणूक करार होण्याची शक्यता आहे. यात 1.2 लाख कोटी ते 1.4 लाख कोटी या दरम्यान करार होण्याची शक्यता आहे.