राज्यभरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल कारागीर तयार होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आयटीआयमधून दिले जाते. राज्य शासनाकडून आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मासिक विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात आली आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना यापुढे महिन्याला 500 रुपये विद्यावेतन (Stipend for ITI students) दिले जाणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या खात्यात ते जमा केले जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधिमंडळात दिली आहे.
विद्यावेतनात वाढ-
राज्यातील औद्योगिक क्षेत्रासाठी कुशल कामगार आणि स्वयं रोजगार निर्मितीस प्रोत्साहन हे उद्देश समोर ठेवून राज्य सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील(ITI) विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. सुरुवातीला केवळ 40 रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. मात्र, आता या विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनात वाढ करण्यात आली असून ते 500 रुपये प्रति विद्यार्थी करण्यात आले आहे.
सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार विद्यावेतन-
आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हे विद्या वेतन देण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपयांच्या आत आहे, अशा विद्यार्थ्यांनादेखील राज्य शासनाकडून 500 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. या विद्यावेतन सप्टेंबर 2023 पर्यंत सुरू करण्यात येईल अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिली.
विद्यार्थ्यांसाठी करिअर विषयक हेल्पलाईन
याच बरोबर राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर विषयक संधीची माहिती देण्यासाठीही कौशल्य विकास मंत्रालयाकडून प्रयत्न करण्यचा येत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध होण्यासाठी कायमस्वरूपी हेल्पलाईन व ईमेल सेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.