मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरासंबंधी शासनाकडून एक दिलासा दायक निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील गिरणी कामगारांना म्हाडाच्या योजनेतून सवलतीच्या दरामध्ये घरे बांधून देण्यात येणार आहेत. मात्र, सध्या मुंबईसह उपनगरामध्ये घरांसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून या गिरणी कामगारांना ठाणे जिल्ह्यात विनामूल्य जमीन उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. या संदर्भात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत माहिती दिली आहे.
43.45 हेक्टर जमीन देणार-
सध्या मुंबई आणि उपनगरातील बंद पडलेल्या गिरणीच्या जागेतील पुर्नर्विकास प्रकल्पामध्ये म्हाडाच्या ताब्यात उपलब्ध असलेली जमीन अपुरी आहे. त्यामुळे गृहनिर्माण मंत्रालयाकडून गिरणी कामगारांच्या घरासाठी ठाणे जिल्ह्यात एकूण 43.45 हेक्टर सरकारी जमीन विनामूल्य दिली जाणार आहे. त्यातील 21.88 हेक्टर जमीन गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यासाठी योग्य आहे. म्हाडाकडूनही ही घरे बांधण्यात येणार आहेत.
10 हजार 247 कामगारांना घरे दिली
मुंबईतील गिरणी कामारांना म्हाडाच्या माध्यमातून सवलतीमध्ये घरे देण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 58 बंद गिरण्यापैकी 11 गिरण्यांचा पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. तर उर्वरीत गिरण्यापैकी 37 गिरण्यांमध्ये म्हाडाचा वाटा आहे. मात्र त्यापैकी फक्त 13.78 हेक्टर जमिनीचा म्हाडाला ताबा मिळाला आहे. तसेच म्हाडाकडे ताबा असलेल्या जमिनीपैकी एकूण 15 हजार 870 घरे गिरणी कामगारांना उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. त्यासाठी म्हाडाकडून सोडत काढली असून 13 हजार 760 गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. तर उर्वरित 10 हजार 247 गिरणी कामगारांना घरे देण्यात आली असल्याची माहिती देखील मंत्री सावे यांनी दिली.