राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळावा यासाठी दूध दर समिती नियुक्त केली होती. त्या समितीने आपला अहवाल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्र्याकडे सोपवल्यानंतर गाईच्या दुधाचे दर निश्चित करण्यात आले आहेत. या समितीच्या शिफारशीनुसार गायीच्या दुधाला प्रति लिटरसाठी 34 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. हे दूध सहकारी, सरकारी आणि खासगी दूध संघासाठी निश्चित करण्यात आले आहेत.
21 जुलै पासून मिळणार 34 रुपये दर
दुधाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या असंतोषाची दखल घेत दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी दुग्धव्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने गाईच्या दुधासाठी 34 रुपये प्रतिलिटर दर निश्चित केला आहे. या नवीन दरास राज्य शासनाने मान्यता दिली असून हा दर 21 जुलैपासून लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्पादन आणि संकलन खर्चाचा विचार
दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसाय हा दैनदिन उदनिर्वाहासाठी महत्त्वाचा जोडधंदा आहे. मात्र पशूखाद्याचे दर वाढल्याने आणि दुध संकलन संघाकडून कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्याला दुग्धव्यवसाय तोट्याचा झाला होता. त्यातच दुधाचे उत्पादन वाढल्यास दूध संकलन संघाकडून कमी दराने दूध खरेदी केली जात होती. यावर शेतकरी संघटनांनी शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त भाव देण्याची मागणी करण्यात येत होती. यासर्व बाबींचा विचार करून तसेच खासगी व सहकारी दूध संघांचा संकलन आणि वितरण खर्च ग्राह्य धरून समितीने हा दर निश्चिचत केला आहे. दरम्यान यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून 40 रुपये दूध दर देण्याची मागणी केली होती. मात्र दूध खरेदी संघांनी यास विरोध केला.
दुधाच्या फॅट नुसार मिळणार दर
दूध दर समितीने सरकारला दूध दराबाबत शिफारस करत असताना दुधाच्या फॅटचा विचार करून दर निश्चित केले आहे. यामध्ये दूध खरेदी संघांनी गाईच्या दुधाचा 3.5 ते 8.5 इतका फॅट आल्यास 34 रुपये देण्याची शिफारस केली आहे. याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.