मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश, मोज्याचे दोन जोड आणि बूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय विभाग कामाला लागला आहे.
कुणाला मिळणार लाभ?
मंत्रिमंडळ निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील सरकारी शाळांमध्ये म्हणजेच शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आधी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जात होता. नंतर मात्र या योजनेंतर्गत दारिद्ररेषेखालील पालकांच्या मुलांना देखील हा लाभ घेता येत होता. यंदा मात्र या योजनेपासून वंचित राहिलेल्या दारिद्ररेषेवरील विद्यार्थ्यांना देखील याचा फायदा होणार आहे.
या योजनेंतर्गत पहिली ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन जोडी शालेय गणवेश, एक जोडी बूट आणि सोबत पायमोज्यांचे दोन जोड दिले जाणार आहेत. अनुसूचित जाती, जमाती, दारिद्ररेषेखालील आणि दारिद्ररेषेवरील सर्वच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच सर्वच विद्यार्थ्यांना आता शालेय गणवेश आणि इतर साहित्य मोफत पुरवले जाणार आहे.
#मंत्रिमंडळनिर्णय#CabinetDecisions#MahaNirnay pic.twitter.com/rFtOImy27C
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2023
कोटींची तरतूद
सदर योजना राबविण्यासाठी दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी 600 रुपये प्रमाणे 75.60 कोटींची तरतूद महाराष्ट्र सरकारतर्फे केली गेली आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय देखील घेण्यात आला आहे.
तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या मुलांना प्रति विद्यार्थी 170 रुपये प्रमाणे 82.92 कोटी रुपयांची तजवीज करण्यात आली आहे.
कसा घ्याल या योजनेचा लाभ?
सदर योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे राबविण्यात येते आहे. त्यामुळे शासकीय शाळांमध्ये प्रवेश मिळवलेले सर्व विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. याबाबत पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करायचा आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मदतीने हा उपक्रम राबवला जाणार आहे.