Children Account Maharashtra Bank: मुलांना लहानपणापासूनच बचतीची सवय लागावी यासाठी महाराष्ट्र बँकेने खास युवा योजना सुरू केली आहे. या अंतर्गत 10 ते 18 वयोगटातील मुलांना फक्त 10 रुपये भरून बचत खाते सुरू करता येईल. तसेच या खात्याला किमान रक्कम ठेवण्याची कोणतीही मर्यादा नाही. असे बचत खाते असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देण्यासही बँकेकडून मदत केली जाते.
काय आहे युवा योजना?
10 वर्षांपुढील शालेय विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार कसे चालतात. बचत खाते, ठेवी, व्याजदर, जमा, पैसे काढण्याची तसेच बँकेत जमा करण्याची प्रक्रिया समजावी. मुलांना बचतीची लहान असल्यापासून सवय लागावी यासाठी ही युवा योजना सुरू केली आहे.
मुलांना काय सुविधा मिळतील?
हे बचत खाते विद्यार्थी स्वत: वापरू शकतात. बचत/मुदत आणि आवर्ती ठेवी विद्यार्थ्यांना खात्यात जमा करता येतील. (Maharashtra Bank Yuva yojana) आवर्ती ठेवींमध्ये विद्यार्थ्यांना दरमहा काही ठराविक रक्कम खात्यात जमा करता येईल. यातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याचे शैक्षणिक खर्च भागवण्यात येतील. विद्यार्थी वाढदिवशी किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला एकरकमी काही रक्कम खात्यामध्ये टाकू शकतो. या रकमेवर TDS कापला जाणार नाही.
इतर सुविधा
या बचत खात्यावर एटीएम कार्ड देखील मिळेल याद्वारे पैसे काढता येतील तसेच बिल पेमेंट करता येतील. विद्यार्थ्याच्या पालकांच्या खात्यातून मुलाचे शैक्षणिक शुल्क, होस्टेल शुल्क किंवा इतर शिक्षणासंबंधी पैसे विनाशुल्क पाठवता येतील. मुलाच्या बँक खात्यातून आवर्ती ठेवी खात्यात पैसे विनाशुल्क पाठवले जातील.
शैक्षणिक कर्ज
ज्या विद्यार्थ्यांचे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी युवा योजनेअंतर्गत खाते असेल अशा विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कर्ज बँकेकडून मिळू शकते. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्याने इतर पात्रताही पूर्ण करायला हव्यात.