ही कहाणी आहे 1965 सालातली. बडोदा संस्थानची राणी असलेल्या सीतादेवींना (Sitadevi Gaikwad) कलेची आवड होती. जगभरातील नामवंत कलाकारांनी काढलेली पेंटींग्ज आपल्या संग्रही असावीत असं त्यांना वाटायचं. त्यांनी फ्रान्स देशाचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. कलासक्त सीतादेवी वेगवेगळी कलाप्रदर्शने बघायला देशोदेशी जात असत. एकदा त्यांनी मुलतः फ्रान्सचे रहिवासी असलेल्या आर्ट डीलर डॅनियल वाईल्डस्टेन (Daniel Wildenstein) यांच्याकडून एक चित्र खरेदी केलं. हे काही साधारण चित्र नव्हतं. 18 व्या शतकातील सुप्रसिद्ध कलाकार फ्रॅंकोईस बाउचर याने चितारलेलं 'ला पॉइसि' (La Poesie ) चित्रशैलीतले एक जगप्रसिद्ध चित्र होतं. हे चित्र सीतादेवींनी त्यावेळी 32,920 युरो किंमतीत खरेदी केलं होतं. याची आजची किंमत ₹32,26,143 इतकी आहे. तेव्हा त्या काळात ही किती मोठी रक्कम होती याची कल्पनाच न केलेलीच बरी. इंग्लडभेटीवर आलेल्या डॅनियल यांच्याकडून त्यांनी हे चित्र खरेदी केलं होतं.
पुढे सीतादेवींनी हे चित्र लिलावात काढायचं ठरवलं. जाणकारांनी या चित्राची किंमत केवळ 750 युरो आहे असं त्यांना कळवलं. हे चित्र फ्रॅंकोईस बाउचर याने काढलेलं नसून त्याच्याच कुणातरी जवळच्या व्यक्तीने काढलेले नकली चित्र असल्याचे सांगितले गेले.
सीतादेवींची फसवणूक झाली होती. या फसवणूकीच्या विरोधात 1969 मध्ये सीतादेवींनी इंग्लंडच्या न्यायालयात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. जून 1970 मध्ये हा खटला उभा राहिला. डॅनियल वाईल्डस्टेन यांनी युक्तिवाद केला की मी फ्रान्सचा रहिवासी आहे, सीतादेवी देखील फ्रान्सच्या नागरिक आहेत आणि चित्र खरेदीचा व्यवहार देखील फ्रान्समधील मुख्य कार्यालयातून झालेला आहे. मी केवळ 2 दिवसांच्या इंग्लंड भेटीवर आलेलो असताना आमचा हा सौदा झाला आहे.
सीतादेवींनी मात्र ही मागणी मान्य नव्हती. कारण फ्रान्सचे नियम वेगळे होते. राजघराण्यातील व्यक्तीला न्यायालयीन कामकाजाबद्दल सवलती इंग्लंडमध्ये मिळतात त्या फ्रान्समध्ये मिळणार नव्हत्या. सीतादेवींनी मागणी न्यायालयाने मान्य केली आणि हा खटला इंग्लड मध्येच चालला. हा खटला सीतादेवींनी जिंकला व व्याजासह त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले.
50 वर्षांपूर्वीचे हे प्रकरण सध्या चर्चेत का आहे?
2013 साली भारतातील बँकांना 700 कोटींचा चुना लावून हिरे व्यापारी जतीन मेहता फरार झाला. तो सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. त्याच्या विरोधात स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने इंग्लंडमध्ये खटला दाखल केला आहे. हा खटला भारतात चालवला जावा असे बँकेचे म्हणणे आहे सोबतच जतीन मेहताची जगभरातील संपत्ती जप्त केली जावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. इंग्लड आणि भारत या दोन देशांत आरोपी प्रत्यार्पण करण्याचा करार नाही त्यामुळे घोटाळेबहाद्दर लोक इंग्लंडला जाणे पसंत करतात. नीरव मोदी, विजय मल्ल्या हे देखील इंग्लंडला स्थायिक झाले आहेत.
जतीन मेहताने कोर्टात युक्तिवाद करताना सीतादेवींच्या खटल्याचा दाखला दिला आहे. मी इंग्लंडचा रहिवासी असून भारतात खटला चालवला जाऊ नये असे त्याचे म्हणणे आहे. सीतादेवींची मागणी मान्य करून न्यायालयाने जसा निर्णय दिला होता त्याच धर्तीवर मला देखील दिलासा मिळावा असे जतीन मेहताचे म्हणणे आहे. त्यांच्या या युक्तिवादाने बडोद्याच्या महाराणींची झालेली फसवणूक पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.