राज्य मंत्रिमंडळाने आज बुधवारी 28 जून 2023 रोजी झालेल्या बैठकीत आरोग्य विमा योजनेबाबत मोठा निर्णय घेतला. राज्यात राबवण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची मर्यादा 1.5 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर ही योजना केशरी आणि पिवळे रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांसाठी मर्यादित न ठेवता सर्वच रेशनकार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
राज्य सरकारने मार्च महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली होती. त्यावर आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारकांसाठी असलेली महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आता सर्वच प्रकारच्या रेशनकार्डधारकांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जन आरोग्य योजना राज्यातील 12.5 कोटी जनतेला आरोग्य विमा संरक्षण देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रूपये आहे. आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रूपये एवढे करण्यात आले आहे.दोन्ही योजनांचे एकच कार्ड, कार्ड वाटप लवकरच सुरू होणार आहे.
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या 1356 एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची संख्या एक हजार एवढी आहे.
मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण 2.5 लाख एवढी मर्यादा आहे. ती आता 4.5 लाख रूपये एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजना ही याआधीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यांत 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याव्यतिरिक्त 200 रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित करुन राज्यातील नागरिकांना 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण देण्यात येणार आहे. राज्यात 2 कोटी कार्ड्स वाटण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय आजच्या बैठकीत राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कॅबिनेटने 210 कोटींच्या निधीला मान्यता दिली. या दवाखान्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा आणि उपचार केले जातात.
अर्थसंकल्पात राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3501 कोटींची तरतूद केली होती. त्यानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.