गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे (Banana Crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर केळी रोपांवर आलेल्या ‘सीएमव्ही’(cucumber mosaic virus - CMV) रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. दरम्यान, राज्य शासनाकडून CMV रोगाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात एकूण 15,663 केळी उत्पादकांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. त्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडून नुकसान भरपाई वितरित करण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना 19 कोटी 73 लाखांची मदत-
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळी पिकांवर सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या विषाणूनचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यात एकूण 8771 हेक्टर केळी पिकाचे नुकसान झाले होते. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 54 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. दरम्यान राज्य सरकारकडून CMV पीक बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना तब्बल 19 कोटी 73 लाख रुपयांची मदत वितरित करण्याचे आदेश मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहेत.‘केळी या पिकासाठी अशा प्रकारे रोगाच्या प्रादुर्भासाठी पहिल्यांदाच नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना 2 हेक्टरसाठी मिळणार मदत
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना विषाणूमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी देण्यात येणारी 19 कोटी 73 लाख रुपयांची आर्थिक मदत ही सरकारी निकषानुसार दिली जाणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी पीक बाधित शेतकऱ्यांना प्रति 2 हेक्टरसाठी ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ही नुकसान भरपाई शासनाच्या सुधारित दर आणि निकषांप्रमाणे दिली जाणार आहे.