दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किंमतीतला बदल म्हणजे प्रत्यक्ष खिशावर परिणाम... जुलै महिन्यात होणाऱ्या या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. गॅस सिलिंडर, सीएनजी, पीएनजी त्याचबरोबर क्रेडिट कार्डचा वापर, आयकर अशा विविध बाबींमध्ये नेमके काय बदल होणार आहेत, याविषयी सविस्तर जाणून घेऊ...
Table of contents [Show]
एलपीजी किंमतीत बदल
देशातल्या सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी सिलिंडरची (Liquefied petroleum gas) किंमत निश्चित करत असतात किंवा त्यात सुधारणा करतात. जुलैपासून आता एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होणार आहे. मे आणि एप्रिलमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली होती, मात्र 14 किलो गॅस सिलिंडरच्या दरात बदल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे येत्या महिन्यापासून एलपीजीच्या किंमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
क्रेडिट कार्डच्या खर्चावर 20 टक्के टीसीएस (TCS)
परदेशात असताना तुम्ही क्रेडिट कार्ड वापरल्यास त्यावरच्या खर्चावर टीसीएस (Tax collected at source) लागू करण्याची तरतूद आहे. 1 जुलै 2023पासून याची अंमलबजावणी होईल. या अंतर्गत 7 लाखांपेक्षा जास्त खर्चावर 20 टक्क्यांपर्यंत टीसीएस शुल्क आकारलं जाणार आहे. मात्र शिक्षण तसंच वैद्यकीय कारणांसाठी हे शुल्क 5 टक्क्यांपर्यंत कमी केलं जाणार आहे. तर समजा तुम्ही परदेशात शैक्षणिक कर्ज घेत असाल तर हे शुल्क आणखी कमी करून 0.5 टक्के केलं जाईल.
सीएनजी, पीएनजीच्या किंमतीत बदल
दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही सीएनजी (Compressed natural gas) आणि पीएनजीच्या (Piped Natural Gas) किंमतीत बदल होऊ शकतो. दिल्ली आणि मुंबईतल्या पेट्रोलियम कंपन्या पहिल्या तारखेला गॅसच्या किंमतीत बदल करत असतात. सध्या पेट्रोल-डिझेलप्रमाणे सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीदेखील वाढत आहेत. आता जुलैमध्ये यात वाढ होते की किंमती स्थिर राहतात, हे पाहणं गरजेचं आहे.
आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख
प्रत्येक करदात्याला आयकर भरावा लागतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीखदेखील जुलैमध्ये संपत आहे. अशावेळी तुम्ही अजून आयटीआर भरला नसेल तर 31 जुलैपर्यंत फाइल करावा लागेल. जुलैअखेर आयटीआर भरण्याची मुदत आहे. त्याआधी आयकर भरल्यास अनेक फायदे करदात्याला होणार आहेत. त्यात कर्ज सहज उपलब्ध होण्याचा एक फायदा आहे. विशेषत: गृहकर्जासाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणून तीन वर्षांचा आयकराचा तपशील मागितला जातो. याशिवाय व्हिसा मिळवणं, विमा संरक्षण, मालमत्ता खरेदी-विक्री, व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कंत्राट मिळवण्यासाठी अशा विविध बाबींमध्ये आयटीआर भरण्याचा फायदा आहे.