मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलने लोट्स चॉकलेट कंपनीचे अधिग्रहण केले आहे. लोट्स चॉकलेटमधील 51% हिस्सा रिलायन्स रिटेलने खरेदी केला. या वृत्तानंतर आज शेअर मार्केटमध्ये लोट्स चॉकलेट कंपनीच्या शेअरमध्ये 5% हून अधिक वाढ झाली. मागील पाच सत्रात लोट्स चॉकलेटचा शेअर 24.89% ने वाढला आहे.
आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात लोट्स चॉकलेटचा शेअर 5% ने वधारला आणि तो 122.95 रुपयांना गेला. ( Lotus Chocolate Shar hit upper Circuit) काल गुरुवारी लोट्सचा शेअर अप्पर सर्किटमध्ये स्थिरावला होता. रिलायन्स रिटेलची उपकंपनी रिलायन्स कन्झुमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने लोट्स चॉकलेटचे 6548935 शेअर खरेदी केले. हा व्यवहार 113 रुपये प्रती शेअर या किंमतीवर झाला. यासाठी रिलायन्स कन्झुमर प्रॉडक्ट्सने 74 कोटी खर्च केले.
किरकोळ व्यापार क्षेत्रात रिलायन्स रिटेलने आक्रमक विस्तार सुरु ठेवला आहे. नुकताच रिलायन्स रिटेलने मेट्रो कॅश अॅंड कॅरी या कंपनीच्या भारतातील व्यवसायाचे अधिग्रहण केले होते. लोट्स चॉकलेटची चॉकलेट बाजारपेठेत वेगळी ओळख आहे. त्यांच्या अनुभवाचा रिलायन्स रिटेलला फायदा होईल, असे मत रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी यांनी व्यक्त केले.
लोट्स चॉकलेट ही एक स्मॉलकॅप कंपनी असून कंपनीचे बीएसईवरील बाजार भांडवल 157.88 कोटी इतके आहे. रिलायन्स रिटेलच्या डिलपूर्वी मागील महिनाभरात लोट्स चॉकलेटचा शेअर 26% ने वाढला होता.