सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. असे असले तरीही बँकेतील मुदत ठेव (Fixed Deposit) हा सर्वात जुना आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून ओळखला जातो. ठराविक कालावधीसाठी एफडीमध्ये पैसे गुंतवल्यानंतर त्यावर बँक व्याजदर लागू करते. सर्वसामान्य बचत खात्यात मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त व्याजदर एफडीमध्ये देण्यात येतो. सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ केल्यानंतर अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. अनेक बँका सध्या 9% पर्यंत व्याजदर ग्राहकांना देत आहेत.
आपल्यापैकी बरेच जण बँकेमध्ये एफडी (FD) करतात. मात्र कधी पैशांची चणचण भासली की, हीच एफडी मोडून आर्थिक अडचण सोडवली जाते. परिपक्व कालावधी (Maturity Period) पूर्ण होण्यापूर्वीच एफडी मोडली, तर अपेक्षित परतावा (Returns) मिळत नाही. बँकेकडून एफडीवर ग्राहकांना कर्ज (Loan) उपलब्ध करून दिले जाते. हा पर्याय तुमची आर्थिक अडचणही सोडवतो आणि तुम्हाला एफडीमधून चांगला परतावा देखील मिळवून देतो.
Table of contents [Show]
एफडीवर कर्ज कोण घेऊ शकतं?
एफडीवर कर्ज घेण्यासाठी त्या बँकेमध्ये तुमचे सॅलरी अकाउंट (Salary Account) किंवा करंट अकाउंट (Current Account) असणे गरजेचे आहे. एफडी करणारा कोणताही व्यक्ती एफडीवर कर्ज घेऊ शकतो. फक्त त्यासाठी त्याचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) चांगला असणे गरजेचे आहे. खराब क्रेडिट स्कोअर असणाऱ्या लोकांना बँका सहसा कर्ज उपलब्ध करून देत नाही. असे असले तरीही हा नियम बंधनकारक नाही.
साधारण किती टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येते?
पैशाची अडचण भासली, तर ग्राहक एफडी (FD) मोडण्यापेक्षा त्या एफडीवर कर्ज घेऊ शकतात. बँका ग्राहकांना त्यांच्या एफडीवर कर्ज उपलब्ध करून देतात. साधारण एफडीतील एकूण गुंतवणुकीपैकी 90 ते 95% रकमेचे कर्ज बँकेकडून उपलब्ध करून देण्यात येते. तसेच एफडीवर ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा (Overdraft Facility) देखील मिळते. बँक ग्राहकाला एकूण एफडीमधील रकमेच्या 90% रकमेवर ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध करून देते. जर तुम्ही एफडीवर कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला वैयक्तिक कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा कमी व्याज एफडीवर भरावे लागते.
प्रक्रिया शुल्क आणि व्याजदर जाणून घ्या
एफडीवर घेतलेल्या कर्जावर प्रामुख्याने एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा 2% जास्त व्याज आकारले जाते. मात्र त्याच्यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क (Processing Charge) आकारले जात नाही. तसेच व्याज हे घेण्यात आलेल्या रकमेवर आकारले जाते. जर ग्राहकांनी घेतलेले कर्ज त्यांना फेडता नाही आले, तर त्यांच्या एफडीतील रकमेतून कर्ज वजा करण्यात येते.
कर सवलत मिळते का?
ग्राहकांनी जर 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एफडी केली, तर आयकराच्या कलम 1961 नुसार 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेता येतो. मात्र 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी केली असेल, तर मात्र ग्राहकांना कर भरावा लागतो.
(Source: hindi.moneycontrol.com)