भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) खास नोकरदार वर्गासाठी टर्म इन्शुरन्स प्लॅन जाहीर केला आहे. एलआयसीच्या या टर्म प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाला आर्थिक सुरक्षा पुरवली जाणार आहे. जे नोकरदार आहेत आणि ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, अशा नोकरदारांना हा टर्म प्लॅन फायदेशीर आहे, असा दावा एलआयसीने केला आहे.
टर्म इन्शुरन्समध्ये पॉलिसी कालावधी पूर्ण झाला तर त्यावर कोणताही सर्व्हाव्हल बेनिफिट मिळत नाही, मात्र पॉलिस काळात पॉलिसीधारकाचे निधन झाले तर त्याच्या वारसांना पूर्ण नुकसान भरपाई दिली जाते.या पॉलिसीसाठी 16 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. 16 ते 65 या वयोगटातील ग्राहक एलआयसी टेक टर्म इन्शुरन्स खरेदी करु शकतो. ही पॉलिसी किमान 10 वर्षांसाठी किंवा जास्तीत जास्त 40 वर्षांसाठी घेता येईल. मात्र यात पॉलिसी टर्म ही 40 वर्ष किंवा ग्राहकाच्या वयाची 80 वर्ष जे आधी असेल ते निवडले जाईल. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी किमान शिक्षणाची देखील अट आहे. यात किमान 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पूर्ण एलआयसी टेक टर्म इन्शुरन्समध्ये किमान 50 लाखांची पॉलिसी खरेदी करता येईल. ही पॉलिसी काढताना ग्राहकाचे स्वत:चे उत्पन्न असणे आवश्यक आहे. वर्षाला किमान 3 लाख रुपयांचे उत्पन्न आवश्यक आहे.भारतीय नागरिक किंवा अनिवासी भारतीय काही अटींच्या आधारे एलआयसी टेक इन्शुरन्स खरेदी करु शकतात, असे एलआयसीने म्हटले आहे. या पॉलिसीसाठी किमान प्रीमियम 3000 रुपये असून सिंगल प्रीमियम जास्तीत जास्त 30000 रुपये असेल. ही योजना गृहिणी किंवा गर्भवती महिलांसाठी नाही, असे एलआयसीने स्पष्ट केले आहे.
कमी वय असताना टर्म इन्शुरन्स का घ्यावा?
साधारण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. वाढत्या वयानुसार पॉलिसी प्रिमियमही वाढत जातो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही 25 वर्षांचे आहात आणि नुकताच जॉब सुरू केला आहे. तुम्ही 50 लाखाचा कव्हर असणारी टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा विचार करत आहात. यासाठी तुम्हाला 900 रुपये दरमहा प्रिमियम भरावा लागेल. मात्र, तुम्ही पॉलिसी घेण्यास टाळाटाळ केली आणि हीच पॉलिसी तीसाव्या वर्षी घेण्याचे ठरवले तर तुम्हाला प्रिमियम कदाचित 1500 रुपये भरावा लागू शकतो. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही पॉलिसी काढाल तेवढे तुमचे पैसे वाचतील.
टर्म पॉलिसीमध्ये एकदा प्रिमियमची रक्कम निश्चित झाली की पूर्ण पॉलिसी काळापर्यंत तेवढीच राहते. प्रिमियम भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. समजा तुम्ही प्रत्येक महिन्याला प्रिमियम भरण्याचा पर्याय निवडला असेल आणि तुम्हाला 900 रुपये द्यावे लागत असतील तर पूर्ण पॉलिसी कालावधीपर्यंत तुम्हाला तेवढेच पैसे दरमहा भरावे लागतील.
कौटुंबिक जबाबदारी आणि आर्थिक नियोजन
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करायला लागल्यानंतर पुढच्या काही वर्षांतच तरुण/तरुणींवर कौटुंबिक जबाबदारी पडते. लग्न झाल्यानंतर पत्नी, मूल आणि सोबतच वयोवृद्ध होत चाललेले आई-वडील या सर्वांची जबाबदारी कमावत्या व्यक्तीवर पडते. अशा वेळी जर घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळू शकते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा ओळखून आधीच योग्य असा टर्म इन्शुरन्स खरेदी केला असेल तर या क्लेमच्या रकमेतून तुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीत सापडण्यापासून वाचवू शकता. जबाबदारी आल्यानंतर वाढत्या खर्चामुळे पॉलिसी घेण्यासही टाळाटाळ होते. त्यामुळे पैसे कमवायला लागल्यानंतर लगेचच जीवन विमा काढणे योग्य ठरू शकते.