चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी केल्याने आज सोमवारी 14 नोव्हेंबर 2022 रोजी ‘एलआयसी’चा शेअरमध्ये मोठी वाढ झाली. इंट्रा डेमध्ये ‘एलआयसी’च्या शेअरने 9% पर्यंत झेप घेतली होती. शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यापासून पहिल्यांदा'च एका सत्रात ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये इतकी मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदार सुखावले. (LIC Share Sharp Rise Today)
शेअर बाजारात प्रवेश केल्यापासून ‘एलआयसी’चा शेअर सातत्याने घसरत होता. आतापर्यंत हा शेअर 30% अधिक कोसळला आहे. त्यामुळे IPO मध्ये शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावे लागले. दरम्यान, आज शेअरमधील तेजीने गुंतवणूकादारांचा जीव भांड्यात पडला. आजच्या तेजीमागे दुसऱ्या तिमाहीची 'एलआयसी'ची कामगिरी कारणीभूत ठरली. याच कामगिरीवर येत्या सत्रात देखील LIC चा भाव वधारेल, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे. ICICI सिक्युरिटीजने ‘एलआयसी’च्या शेअरचे सुधारित लक्ष्य 917 रुपये ठेवले आहे. सध्याच्या पातळीच्या तुलनेत तो 38% शेअर वधारेल, असा अंदाज ICICI सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे.
आजच्या सत्रात ‘एलआयसी’चा शेअर इंट्रा डेमध्ये 9% तेजीसह 682.7 रुपयांच्या पातळीवर गेला होता. अखेर बाजार बंद (BSE) होताना LIC 664.80 रुपयांवर स्थिरावला. त्यात 5.85% वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर LIC 664.65 रुपयांवर बंद झाला. या तेजीने ‘एलआयसी’चे मार्केट कॅप 59000 कोटींवर गेले आहे.
‘एलआयसी’ला झाला 15952 कोटींचा नफा
‘एलआयसी’ला 30 सप्टेंबर अखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत 15952 कोटींचा नफा झाला. त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी याच तिमाही ‘एलआयसी’ला 1433 कोटींचा नफा मिळाला होता. तर याच वर्षातील जून तिमाहीत महामंडळाला केवळ 682.9 कोटींचा नफा झाला होता. ‘एलआयसी’ 9124.7 कोटी रुपये पहिल्या वर्षाचा प्रिमीयममधून मिळाले आहेत. त्याशिवाय नेट प्रिमीयममधून उत्पन्न 1.32 लाख कोटी इतके मिळाले. गेल्या वर्षी याच तिमाहीत महमंडळाला 1.04 लाख कोटींचे प्रिमीयम इन्कम मिळाले होते. ‘एलआयसी’कडून लवकर लाभांश जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.