एलआयसीच्या लिस्टिंगनंतर यावर्षीच्या जागतिक स्तरावरील सर्वाधिक नुकसानकारक कामगिरी करण्याच्या क्रमवारीत LIC चा आयपीओ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर चिप उत्पादक कंपनी एएसआर मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स (ASR Microelectronics) आहे. या कंपनीचे शेअर्स ट्रेडिंग डेब्यू दरम्यान शांघायमध्ये 34 टक्क्यांनी घसरले होते.
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ची लिस्टिंग ही या वर्षातील महत्त्वाच्या आयपीओ ओपनिंगमधील सर्वात वाईट ठरली आहे. चीप उत्पादक कंपनी असलेल्या एएसआर मायक्रोइलेक्ट्रॉनिक्सचे (ASR Microelectronics) शेअर्स आयपीओ लिस्टिंगनंतर जानेवारीमध्ये 34 टक्क्यांनी घसरून वाईट कामगिरीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर LIC च्या शेअर्समध्ये आठ टक्क्यांची घसरण होऊन तो दुसऱ्या क्रमांकाचा नुकसानकारक कामगिरी करणारा आयपीओ ठरला आहे. असे वृत्त बिझनेस स्टॅण्डर्ड या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने दिले आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्सचे 17 मे रोजी भांडवली बाजारात सवलतीच्या दरात लिस्टिंग झाले. भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासातील सर्वांत मोठा आयपीओ म्हणून नोंद झालेल्या एलआयसीकडून सर्वसामान्य गुंतवणूकदारांसह एलआयसी पॉलिसीधारकांची घोर निराशा झाली आहे. मंगळवारी मार्केटच्या पदार्पणातच एलआयसीचा शेअर 8 टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आता पुढे काय करायचं, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.
एलआयसीचा शेअर बाजारात लिस्ट होताना सुमारे 9 टक्के डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. एलआयसीने प्रति शेअरची किंमत 949 रुपये निश्चित केली होती. त्यानुसार कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 6 लाख कोटींपेक्षा अधिक होते. पण काल झालेल्या घसरणीमुळे कंपनीच्या भांडवलामध्ये 42 हजार 500 कोटींची घट झाली. याचा फटका गुंतवणुकदारांनाही बसला आहे. त्यामुळे गुंतवणुकदार संभ्रमात आहेत.
भांडवली बाजारातील अस्थिरतेमुळे एलआयसीच्या शेअर्सचे पदार्पण कमकुवत झाले. पण बाजारात जशी सुधारणा होईल, त्यानुसार एलआयसीच्या शेअर्स प्राईसमध्येही सुधारणा होईल. ज्यांना आयपीओद्वारे एलआयसीचे शेअर्स मिळाले नाहीत. ते आता खरेदी करू शकतात. तसेच यात दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरू शकेल. कारण दीर्घ कालावधीत एलआयसीच्या शेअर्सची कामगिरी निराशाजनक असण्याचे कोणतेच कारण नसल्याचे, एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांनी म्हटले आहे.