एखादी व्यक्ती कामानिमित्त परदेशात राहायला गेली असेल, आणि तिथे आपल्या देशातील आपल्याला आवडतील असे पदार्थ उपलब्ध नसतील, तर खाण्याची मोठी पंचाईत होते. वेगळ्या प्रदेशातील, वेगळ्या चवीचे पदार्थ ’चला आज काही वेगळ Try करूया’ असं म्हणून एखाद्या दिवशी खावू शकतो, पण रोज वेगळ्या धाटणीचा पदार्थ प्रत्येकाला खायला आवडेलच असं नाही, मग अशावेळी आठवण येते, घरच्या जेवणाची... त्यातल्या त्यात आईच्या हातच्या चवीची! अशावेळी आईच्या हातच्या जेवणाची उणीव भरून निघावी, जगाच्या कुठल्याही काना-कोपऱ्यात गेलात तरीही प्रत्येकाला आपल्या घरचं, हक्काचं जेवण खायला मिळावं म्हणून अनिता चोपडा यांनी एक व्यवसाय सुरु केला. आता त्या यशस्वी उद्योजिकेच्या भूमिकेतून ‘लिला इन्स्टंट फूड’ (Leela Instant Food)च्या माध्यमातून देशोदेशी आईच्या हातची चव पोहचवत आहेत.
Table of contents [Show]
- तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली?
- या कामाबद्दल आत्मविश्वास कसा वाढला?
- तुमचा व्यवसाय इतरांपर्यंत कसा पोहचला?
- ‘व्हॅक्युम पॅकेजिंग’ मशिनबद्दल काय सांगाल?
- इन्स्टंट फूडची प्रक्रिया कशी केली जाते?
- या पद्धतीमध्ये कोणते रासायनिक प्रक्रिया केली जाते का?
- लीला इन्स्टंट फूडचं प्रॉडक्ट वापरण्याची पद्धत काय आहे?
- ज्यांना तुम्हांला ऑर्डर द्यायची आहे, त्यांना काय सांगाल?
- ‘इन्स्टंट पॅक्ड फूड’ ची किंमत कशी ठरवली जाते?
- लीला इन्स्टंट फूडचे कोणते प्रॉडक्ट उपलब्ध आहेत?
तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली?
मी 2017 पासून ‘लिला इन्स्टंट फूड’या नावाने स्टार्ट-अप सुरू केले. ‘माँ के हात का खाना,कही भी,कभी भी’! या ब्रीदवाक्याने आतापर्यंत अनेक देशांमध्ये आमचे पार्सल पोहोचले आहेत. मुलाला परदेशात आपल्या हातचे पदार्थ खायला देण्याच्या प्रयत्नातून माझा व्यवसाय सुरु झाला. माझा मुलगा ऋषभ हा स्वीडन देशात शिकण्यासाठी गेला त्यावेळी, तिथे कमी भारतीय नागरिक होते आणि भारतीय पदार्थ सुद्धा कमी मिळायचे. मुलाची खाण्याची सोय व्हावी आणि घरचे पदार्थ खायची इच्छा झाल्यावर त्याला ते पदार्थ मिळावेत म्हणून, मी तयार पदार्थांवर अनेक प्रयोग करायचे. त्यातूनच मी स्वत: ‘डिहायड्रेट’ आणि ‘व्हॅक्युम पॅकेजिंग’ करायला शिकले.
या कामाबद्दल आत्मविश्वास कसा वाढला?
पुण्यातील एक महिला ज्यांचे पती स्वीडनमध्ये तर मुलगा अमिरिकेत होता, त्या दोघांना ठराविक पद्धतीचीच भाजी आवडत होती. त्यामुळे इन्स्टंट फूडसाठी ‘उद्योग आधार’मध्ये त्या कोर्स करायला गेल्या. तिथे त्यांना माझा संदर्भ मिळाला. मग आम्ही दोघींनी मिळून भाजी तयार करून एकत्र प्रयोग केले. आणि यशस्वीपणे इन्स्टंट फूड तयार करून दोन्ही देशांत पाठवले. त्यातूनच माझा आत्मविश्वास वाढला आणि मी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
तुमचा व्यवसाय इतरांपर्यंत कसा पोहचला?
माझ्या मुलाने, ऋषभने याबद्दल मार्केटिंग करायला सुरूवात केली. एका भारतीय विद्यार्थ्याकडून दुसर्या आणि दुसर्याकडून तिसर्याकडे या इन्स्टंट फूडची माहिती कळली की, ते त्यांच्या घरी याविषयी सांगायचे आणि त्यांचे कुटुंबीय माझ्याकडून पदार्थांचे पॅक करून घ्यायचे. अशाप्रकारे, माझा व्यवसाय वाढत गेला. भारतासह युरोपियन देश,अमेरिका,रशिया यांसह अनेक देशात आमचं हे ‘इन्स्टंट पॅक्ड फूड’ पोहोचलं आहे.
‘व्हॅक्युम पॅकेजिंग’ मशिनबद्दल काय सांगाल?
पूर्वीच्या काळी घरोघरी वाळवणे केली जात होती. हेच लक्षात घेऊन मी अभ्यास केला. दरम्यान ऋषभ स्वीडनमध्ये समुद्रातील शेवाळ सारख्या पदार्थावर संशोधन करत होता. त्याचा फायदा मला ‘डिहायड्रेशन’ या प्रक्रियेसाठी झाला. मी सुरूवातीला ‘मायक्रोव्हेव’मध्ये पदार्थ कोरडे केले. बऱ्याच पदार्थांवर ‘ट्रायल अँड एरर बेसिस’वर प्रयत्न केले. त्यानंतर त्यामधील पाणी किती काढायला हवे, किती ‘मॉईश्चर’ ठेवायला हवे, याबाबत बरेच संशोधन करून मी आणि ऋषभने मिळून ‘डिहायड्रेट’ आणि ‘व्हॅक्युम पॅकेजिंग’ होणारे मशिन डिझाईन केले. त्याच्या आधारे पावभाजी हा पहिला पदार्थ यशस्वीरित्या ‘डिहायड्रेट’ करून मी ऋषभला पाठवला होता.
इन्स्टंट फूडची प्रक्रिया कशी केली जाते?
लीला इन्स्टंट फूडमध्ये 40, 100 आणि 150 किलो पदार्थ ‘डिहायड्रेट’ आणि ‘व्हॅक्युम’पॅक करण्याची क्षमता असलेल्या मशिन्स आहेत. ग्राहकांकडून तयार भाज्या या स्टीलच्या डब्यांमध्ये मागवल्या जातात. त्या डब्यांवर आणि प्रक्रिया करण्याच्या ट्रेवर ग्राहक आणि पदार्थाचे नाव चिकटवले जाते. मशिनद्वारे भाजीला ‘डिहायड्रेट’ करून त्यातील पाणी पूर्णपणे काढून त्यातली आर्द्रता कमी केली जाते. तसेच चपाती,ठेपले यांचे ‘व्हॅक्युम पॅकेजिंग’ केले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया व्हायला 16 ते 18 तास लागत असल्याने 3-4 दिवसांतर ‘इंन्स्टंट फूड’चे पॅक्स ग्राहकांना मिळतात.
या पद्धतीमध्ये कोणते रासायनिक प्रक्रिया केली जाते का?
या प्रक्रियेत कोणतेही रसायन अथवा ‘प्रिझरव्हेटिव्ह’ वापरले जात नाही. एका पदार्थांची चव आणि वास दुसर्या पदार्थाला लागणार नाही याचीही पूर्ण काळजी घेतली जाते. प्रक्रियेनंतर पदार्थाचा रंग आणि चव हा 90% सारखाच राहतो. पदार्थांचे पोषण मूल्य 80% राहते. भाजी फ्रिजशिवाय 6 ते 8 महिने तर ठेपले, चपाती 10 ते 15 दिवसांपर्यंत टिकून राहते.
लीला इन्स्टंट फूडचं प्रॉडक्ट वापरण्याची पद्धत काय आहे?
‘डिहायड्रेट’ केलेली भाजी पातेल्यात काढून घ्यायची. त्यामध्ये पाणी घालून झाकण ठेवायचे. त्याला एक उकळी आल्यावर भाजी तयार होते. ही सर्व प्रक्रिया इन्स्टंट फूड पाकिटावर लिहिलेली असते. तरी सुद्धा प्रत्येक देशात गॅस आणि त्याची फ्लेम वेगळी असते. त्यानुसार भाजी शिजण्यामध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे काही अडचण असल्यास व्हॉट्सऍप कॉलद्वारे मी उपलब्ध असते. प्रत्येक पाकिट हे 50 ग्रामचे असते. एकदा फोडलेले पाकिट नंतर कधीही आपण वापरू शकतो.
ज्यांना तुम्हांला ऑर्डर द्यायची आहे, त्यांना काय सांगाल?
आईच्या हाताची चव परदेशी पाठवण्याच काम मशीन्सद्वारे केले जात असल्याने आणि त्या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने कोणालाही ऑर्डर द्यायची असल्यास स्लॉट बुक करणे आवश्यक असते. अशावेळी पदार्थाची चव बिघडता कामा नये, याकडेही लक्ष द्यावे लागते, म्हणूनच, 24 तासांच्या आधी बुकिंग करणे गरजेचे आहे. तसेच, भाज्या व्यवस्थितपणे कापलेल्या असून पूर्ण शिजलेल्या असाव्यात.
‘इन्स्टंट पॅक्ड फूड’ ची किंमत कशी ठरवली जाते?
प्रत्येक पदार्थाच्या वजनानुसार किंमतीचे गणित मांडले जाते. भाजी किंवा भात 5 किलोपेक्षा कमी असेल तर 300 रुपये किलो प्रमाणे बिल बनविले जाते. तर, तेच प्रमाण 5 किलोपेक्षा जास्त असेल तर 250 रुपये किंमत लावली जाते.
लीला इन्स्टंट फूडचे कोणते प्रॉडक्ट उपलब्ध आहेत?
लीला इन्स्टंट फूड मराठमोठ्या पदार्थांबरोबर बरेच टिकाऊ पदार्थ बनवून देते. यामध्ये पाव भाजी, पोहे, उपमा, रेड ग्रेव्ही, मिसळ, मुगडाळ हलवा, पाकीट पुलाव, घी फुलका, चपाती/भाकरी, ठेपला या पदार्थांचा समावेश आहे. या सर्व पदार्थांची माहिती आणि किंमत लीला इन्स्टंट फूडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अशाप्रकारे, स्वत: बनवलेला पदार्थ आपल्या मायेच्या माणसांना पोहचवून घरचा Feel देण्याचे काम व्यवसायाद्वारे करता येऊ शकतं, हे अनिता चोपडा यांनी लीला इन्स्टंट फूडमार्फत दाखवून दिले आहे.
स्त्रोत: यशस्वी उद्योजक