Good Financial Behaviour for Better Credit Score: तुम्ही जर क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असाल तर, हा विषय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण पर्सनल फायनान्सला घेऊन आपण प्रत्येक जण चिंतेत असतो. घराचा दैनंदिन खर्च भागवून ईएमआय, मुलांच्या शाळेची फी आणि इतर खर्चांची सांगड घालताना नाकीनऊ येते. अशावेळी क्रेडिट कार्डचा वापर करून काही जण चालू महिन्यातील निकड भरून काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात. पण त्यांच्या लक्षात येत नाही की, पुढील महिन्यात क्रेडिट कार्डवर केलेल्या खर्चाची रक्कम भरावी लागणार आहे. ती वेळेत भरली नाही तर त्याचा निगेटीव्ह परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. तर आपण क्रेडिट कार्डच्या वापरासंदर्भात काही गोष्टींची माहिती करून घेणार आहोत. ज्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर नक्कीच सुधारेल.
Table of contents [Show]
क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा
क्रेडिट कार्डचा स्कोअर मोजताना क्रेडिट कार्डची तुम्ही भरलेली बिले खूप महत्त्वाची भूमिक बजावत असतात. तसे पाहायला गेले तर तुमच्या एकूण क्रेडिट स्कोअरपैकी 35 टक्के वाटा हा भरलेल्या बिलांचा असतो. तुमचा क्रेडिट स्कोअर मजबूत करण्यासाठी बिले वेळेवर भरणे हा एकमेव आणि जालीम उपाय आहे.
क्रेडिट कार्डवर खरेदी केलेल्या बिलाचे पेमेंट उशीराने केल्यास किंवा त्याची तारीख चुकवल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो आणि त्याचा परिणाम बरेच दिवस राहू शकतो. सुरूवातीला तुमचा क्रेडिट स्कोअर जर जास्त असेल तर तो हळुहळू कमी होत राहतो. त्यामुळे क्रेडिट कार्डची बिले पेंडिंग ठेवणे योग्य नाही.
क्रेडिटचा योग्य वापर करा
तुमचे क्रेडिट लिमिट किती आहे? आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता! हे खूप महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे क्रेडिट कार्ड वापरताना तुम्हाला जितके लिमिट देण्यात आले आहे. त्याच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त क्रेडिट वापरू नये. 30 टक्क्यांपेक्षा कमी क्रेडिटचा वापर हा क्रेडिट स्कोअरसाठी चांगला मानला जातो.
उदाहरणार्थ, तुमच्या कार्डचे क्रेडिट 5 लाख रुपये आहे; आणि तुम्ही त्या कार्डवर एकूण 3 लाखांपर्यंतची खरेदी केली आहे. म्हणजे तुम्ही त्या कार्डमधून 60 टक्के क्रेडिटचा वापर केला आहे. तो क्रेडिट स्कोअरसाठी चांगला नाही. क्रेडिट स्कोअर 30 टक्क्यांपेक्षा खाली राहण्यासाठी, खालील परिस्थितीत क्रेडिट कार्डचा वापर करू नका.
- जेव्हा तुम्ही क्रेडिट लिमिटच्या जवळ पोहोचता
- बिल भरण्याची तरतूद नसल्यास
- ज्या वस्तु तुमच्यासाठी गरजेच्या नाहीत आणि त्या तुमच्या बजेटच्या बाहेर आहेत
एकाचवेळी अनेक कर्ज घेणे टाळा
जेव्हा तुम्ही लोनसाठी नवीन अर्ज करता तेव्हा कर्ज देणाऱ्या बॅंकेकडून किंवा नॉन-बॅंकिंग कंपन्यांकडून संबंधित अर्जदाराची चौकशी केली जाते. यामध्ये बॅंका क्रेडिट रिपोर्ट आवर्जून पाहतात. जेव्हा तुम्ही कमी कालावधीत खूप कर्ज घेतली असतील किंवा क्रेडिट कार्डचा सातत्याने वापर केला असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो.
क्रेडिट स्कोअर तपासा
तुमचा क्रेडिट स्कोअर सातत्याने तपासत राहा. यामुळे तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोअरची स्थिती सतत कळत राहते. यामुळे क्रेडिट स्कोअर वाढतोय की कमी होतोय, हे कळण्यास मदत होते. त्यानुसार क्रेडिट कार्डचा वापर नियंत्रित करण्यास मदत होते. 580-669 या श्रेणीतील क्रेडिट स्कोअर साधारण मानला जातो. तर 300-579 या श्रेणीतील स्कोअर खराब मानला जातो. तर 670-739 श्रेणीतील स्कोअर चांगला, 740-799 या श्रेणीतील स्कोअर अति चांगला आणि 800-850 या श्रेणीतील स्कोअर एक्सलेंट म्हणून ग्राह्य धरला जातो.
क्रेडिट कार्डद्वारे रोख रक्कम घेणे टाळा
क्रेडिट कार्डवर रोख रक्कम उचलणे हे वाईट नाही. पण क्रेडिटवर उचललेली रक्कम घेताना तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाही तर ते तुमच्या क्रेडिट स्कोअरसाठी धोकादायक ठरू शकते. उदाहरणार्थ, तुमच्या क्रेडिट कार्डचे क्रेडिट लिमिट 50 हजार रुपये आहे आणि तुम्ही त्यातून 25 हजार रुपये काढले असतील, तर तुमचे क्रेडिट युटिलायझेशन हे 50 टक्के मानले जाते. जे क्रेडिट स्कोअरसाठी योग्य नाही. कारण 30 टक्क्यांवरील क्रेडिट युटिलायझेशन हे क्रेडिट स्कोअरसाठी निगेटीव्ह मानले जाते.