यंदाचा उन्हाळा चांगलाच लांबला होता. मुंबईसह उत्तरेच्या काही राज्यांमध्ये मॉन्सूनने सध्या जोर धरलाय. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस पडत असतानाच भाजीपाल्याचे भाव देखील चांगलेच वधारलेले पाहायला मिळत आहेत. एक तर उन्हाळा लांबल्यामुळे पालेभाज्यांची लागवड कमी प्रमाणात झाली होती. शेतकऱ्यांना पाण्याआभावी निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याचाच परिणाम म्हणून बाजारात पालेभाज्या कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत.
पालेभाज्यांचा पुरवठा कमी होत असल्यामुळे गेल्या एकाही दिवसांत भाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध शहरात कोथांबिरीची जुडी जवळपास 70-100 रुपये भावाने विकली जात आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात कोथांबिरीची आवक कमी झाली असून सामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसतो आहे. मुंबईत मुख्यत्वे नाशिक, जुन्नर, आळेफाटा भागातून भाजीपाला विक्रीसाठी येतो. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम केल्याचे जाणवते आहे. पावसाळ्यात पालेभाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता भाजी विकेत्यांनी व्यक्त केली आहे.
मेथी, पालक, शेपू बाजारातून गायब!
उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांच्या लागवडीवर परिणाम पाहायला मिळाला होता तर पावसामुळे दळवळणाच्या सुविधेवर परिणाम पाहायला मिळतो आहे. त्यामुळे घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे पाहायला मिळते आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात मेथी, पालक, शेपू या भाज्या तुरळक प्रमाणात नजरेस पडत आहेत. या भाज्या सामान्य कुटुंबांमध्ये नेहमीच बनवल्या जातात. रोजच्या खाण्याचा आहार असलेल्या या भाज्या कमालीच्या महाग झाल्या आहेत. मेथीची जुडी 50-60 रुपये जुडी, पालक 40 रुपये जुडी तर शेपू 50 रुपये जुडी दराने विकली जात आहे.
टोमॅटो देखील महागले
हिरव्या पालेभाज्या महागल्या असताच टोमॅटोचे भाव देखील चांगलेच वाढले आहेत. मुंबई आणि ठाणे भागात टोमॅटो 40-50 रुपये किलो दराने विकले जात आहेत. टोमॅटो शेतकऱ्यांना उन्हाळ्यात चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कीड आणि अळीचा प्रादुर्भाव देखील सहन करावा लागला आहे. त्यामुळे यावर्षी टोमॅटोचे उत्पादन देखील घटले आहे.
श्रावणात फळांचे भाव देखील वाढणार!
एकीकडे पालेभाज्या महागलेल्या असताना फळांचे भाव देखील वाढले आहेत. 50 रुपये डझन भावाने मिळणारी केळी 60 रुपये डझनने विक्रीसाठी उपलब्ध आहे. डाळिंब,चिकू सारख्या रोजच्याच आहारातील फळांमध्ये देखील 5-10 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
मात्र पावसामुळे आंबा, जांभूळ या फळांचे नुकसान होऊ शकते म्हणून कमी दराने फळ विक्रेते आंब्याची आणि जांभळांची विक्री करत आहेत. श्रावण महिन्यात बरेच लोक व्रतवैकल्य करत असतात, अनेकांना उपवास असतो. या काळात फळांचे भाव नेहमीच वधारलेले असतात. आधीच पालेभाज्यांच्या वाढत्या किमतीने हैराण असलेल्या सामान्यांना महागडी फळे विकत घेताना आणि किचन बजेट सांभाळताना मोठी कसरत करावी लागणार आहे.