Land Monkey: आज-काल आपण नेहमीच जमिनीचे व्यवहार हे माणसांशी संबंधित पाहत असतो. जागा, जमिनी, घरे यापैकी कोणतीही संपत्ती असो. ही संपत्ती अमूक अमूक एका व्यक्तीच्या नावावर असते. पण आता माणसांच्या नव्हे, चक्क! माकडांच्या नावावर 32 एकर जमीन आहे! हे मजेशीर प्रकरण नक्की काय आहे? हे आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात.
कोणत्या गावात आहे ही माकडांची जमीन?
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्हयातील ‘उपळा’ या गावी माकडांची स्वत:ची जमीन आहे. हे गाव माकडांमुळे खूप प्रसिद्ध झाले आहे. या गावात माकडांच्या नावावर एक, दोन नाही तर चक्क 32 एकर जमीन आहे. उपळा ग्रामपंचायतीमध्ये जमिनीच्या नोंदीनुसार म्हणजेच सात-बारावरदेखील या मजेशीर प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
उपळा गावाचे सरपंच याबाबत काय म्हणतात?
उपळा गावचे सरपंच बप्पा पडवळ म्हणतात की, शासकीय कागदपत्रांवर स्पष्टपणे माकडांच्या नावावर ही जमीन असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इतर कोणत्याही प्राण्यांसाठी ही तरतूद करण्यात आली नाही. मात्र हे सर्व कोणी व कधी केली याची माहिती आपल्याकडे नाही. आता, गावात जवळपास 100 माकडे आहे. आता ही माकडांची संख्या कमी होताना दिसत आहे.
गावात लग्न समारंभात माकडांना दिला जातो सन्मान
उपळा गावात कोणाचे का लग्न असेना, सर्व लग्नात या माकडांना सन्मान दिला जातो. या गावातील लग्नात पहिले जेवण माकडांना दिले जाते, मग बाकीच्या पंगती बसविल्या जातात. ही या गावाची रीत आहे. गावात कोणत्याही दारात आलेले माकड कधीच उपाशी जात नाही. येथील प्रत्येक ग्रामस्थ माकडांची काळजी घेताना दिसत असतो. समजा, या गावात एखादया माकडाचा मृत्यू झाला, तर त्याला नवीन कपडे घालून, त्याची अत्यंयात्रा काढली जाते.
विशेष म्हणजे, येथे माकडांची संख्या जास्त असल्यामुळे ‘उपळ माकडांची’ अशी या गावाची ओळख बनली आहे.