खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने नुकताच डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क वाढवले आहेत. डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता वार्षिक 259 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क भरावे लागणार आहे. येत्या 22 मे 2023 पासून ही शुल्कवाढ लागू होईल, असे बँकेने म्हटले आहे.
कोटक महिंद्रा बँकेकडून वेगवेगळ्या प्रकारची बचत खाती आणि डेबिट कार्ड इश्यू केली जातात.कोटक महिंद्रा बँकेने डेबिटकार्ड शुल्क वाढीबाबत ग्राहकांना ई-मेल पाठवला आहे. त्यानुसार डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क 199 रुपये अधिक जीएसटी ऐवजी आता 259 रुपये अधिक जीएसटी इतके वाढवण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. 22 मे 2023 पासून सुधारित शुल्क लागू होणार आहे.
कोटक महिंद्रा बँकेच्या विविध सेवांवर लागणारे शुल्क
ट्रान्झॅक्शन फेल्यूअर चार्जेस
ग्राहकांनी इश्यू केलेला चेक रिटर्न आल्यास बँकेकडून 50 रुपयांचा दंड आकारला जातो. यात चेक इश्यू करणाऱ्या ग्राहकाची स्वाक्षरीत बदल असणे, नियमानुसार स्वाक्षरी नसणे अशा नॉन फायनान्शिअल कारणांसाठी हा दंड आकारला जातो.
किमान शिल्लक न ठेवल्यास द्यावे लागेल इतके शुल्क
प्रत्येक बँकेकडून खातेदारांना दरमहा बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याबाबत नियम ठरवण्यात आले आहेत. किमान शिलकेचा नियम मेट्रो आणि निमशहरी भागातील शाखांनुसार बदलतो. कोटक महिंद्रा बँकेकडून बँक खात्यात किमान शिल्लक नसल्यास बँकेकडून 6% इतका दंड आकारला जातो. किमान शिल्लक नसल्यास जास्तीत जास्त 500 ते 600 रुपये इतके दंडात्मक शुल्क वसूल केले जाऊ शकते.
तुमचा दरमहिन्याचा स्टॅंडर्ड इन्स्ट्रक्शन फेल झाल्यास
बँकांकडून ठरविक दिवशी बँक खात्यातून एक निश्चित रक्कम अदा करण्याची सेवा दिली जाते. त्याला स्टॅंडर्ड इन्स्ट्रक्शन असे म्हणतात. हा स्टॅंडर्ड इन्स्ट्रक्शन काही कारणास्तव पूर्ण झाला नाही तर ग्राहकाला 200 रुपयांचा दंड भरावा लागेल.
चेक डिपॉझिट अॅंड रिटर्न फी
चेक डिपॉझिट अॅंड रिटर्न फी म्हणून कोटक बँकेकडून 200 रुपये प्रत्येक वेळी आकारले जातात. मात्र ग्राहकांना नवीन चेकबुकसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
डेबिटकार्डशी संबधित शुल्क
डेबिट कार्ड चोरीला गेले असल्यास नव्याने इश्यू करण्यासाठी बँक 200 रुपये शुल्क आकारते. याशिवाय बँक खात्यात पुरेसा बॅलन्स नसेल आणि एटीएमचा व्यवहार पूर्ण झाला नाही तर बँकेकडून 25 रुपये प्रती व्यवहार शुल्क आकारले जाते. कार्डलेस विथड्रॉव्हल महिन्यातून एकदा निशुल्क आहे. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर 10 रुपये शुल्क आकारले जाते.