Investors Will Get Huge Profits On RD And FD: कोटक महिंद्रा बँकेने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुदत ठेवी (Fixed Deposit) आणि आवर्ती ठेवींच्या (RD) व्याजदरात वाढ केली आहे. सामान्य ग्राहकांसोबतच ज्येष्ठ नागरिकांनाही बँकेच्या नवीन व्याजदराचा लाभ मिळणार आहे. हे नवीन व्याजदर गुरूवार (दि. 11 मे) पासून लागू होणार आहेत. कोटक बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केलेली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना या गुंतवणूक योजनेतून जास्तीत जास्त नफा मिळेल.
Table of contents [Show]
काय आहेत एफडीचे व्याजदर
कोटक महिंद्रा बँकेने सामान्य नागरिकांसाठी एफडी व्याजदरात 2.75 ते 7.20 टक्के वाढ केली आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.25 ते 7.70 टक्के व्याजदर दिला आहे. बँकेने नेहमीच्या ग्राहकांसाठी 180 दिवसांचा कालावधी 50 बेसिस पॉईंट्सने वाढवला आहे. त्यानंतर या कालावधीवरील व्याजदर 6.50 टक्क्यांवरुन 7 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. यानंतर बँकेने 365 दिवसांच्या कालावधीसह 389 दिवसांच्या एफडीवर 10 बेसिस पॉईंट्सने वाढवले आहेत. त्यामुळे त्याचा व्याज दर 7 टक्क्यांवरुन 7.10 टक्के झाला आहे.
आरडीवरील व्याजदर
कोटक महिंद्रा बँक आपल्या नियमित ग्राहकांसाठी आवर्ती ठेवीवर 6 महिने ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 6 ते 7.20 टक्के व्याजदर देत आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नागरीकांसाठी आवर्ती ठेवींवर 6.50 ते 7.70 टक्के व्याजदर दिला जात आहे.
कोटक महिंद्रा बँकेशिवाय एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक या बँकांनी सुद्धा आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. या सगळ्या बँकांनी आपल्या ग्राहकांना 7 टक्क्यांच्या वर व्याजदर देण्याचे निश्चित केले आहे.
एसबीआय बँक (SBI BANK)
एसबीआय बँकेत दोन आणि तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर ग्राहकांना 7 टक्के व्याजदर मिळू शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांना दोन आणि तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी 0.5 टक्के अतिरिक्त व्याजदर मिळू शकतो.
एचडीएफसी बँक (HDFC BANK)
एचडीएफसी बँक 15 ते 18 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 7.10 टक्के व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांना 15 ते 18 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 7.6 टक्के व्याजदर देते. तसेच 18 महिने ते 10 वर्षे मुदतींच्या ठेवींसाठी बँका 7 टक्के व्याजदर देतात. तर समान कालावधीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.5 टक्के व्याजदर दिला जाऊ शकतो. हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींवर लागू आहेत.
आयसीआयसीआय बँक (ICICI BANK)
आयसीआयसीआय बँक 15 महिने ते दोन वर्षांच्या कालावधीत मुदत ठेवींसाठी 7.1 टक्के व्याजदर देते. तर ज्येष्ठ नागरिकांना समान कालावधीकरीता 7.6 टक्के व्याजदर देते. तसेच एक, दोन आणि पाच वर्षांच्या मुदतीच्या ठेवींसाठी बँका 7 टक्के व्याजदर देते. हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींवर लागू आहेत.
येस बँक (YES BANK)
येस बँक मध्ये 15 महिने ते 36 महिन्यांच्या कालावधीतील एफडीसाठी 7.5 टक्के व्याजदर दिला जातो. एक वर्ष ते 15 महिन्यांच्या मुदतीच्या एफडीसाठी खाजगी बँक 7.25 टक्के व्याजदर देते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जाऊ शकतो. हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या मुदत ठेवींसाठी उपलब्ध आहे.