Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Short-Term Investment: एक वर्षांपेक्षा कमी काळासाठी गुंतवणूक करायचीय? चांगला परतावा देणारे पर्याय पाहा

Short Term Investment options

Image Source : www.navi.com

जर तुम्हाला 1 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या योजनेत पैसे गुंतवायचे आहेत. मात्र, नक्की कोणत्या योजनेत पैसे गुंतवावेत समजत नाही, तर हा लेख नक्की वाचा. बचत खात्यापेक्षा चांगला व्याजदर मिळू शकतो. अल्प कालावधीत योजना परिपक्व झाल्यानंतर पैसे काढून घेता येतील.

Short Term Investment options: गुंतवणूक करताना प्रत्येकजण आपले उत्पन्न, जोखीम आणि गरजेनुसार निर्णय घेत असतो. मोठे आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरते. मात्र, बऱ्याच वेळा अल्पकालीन गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज लागू शकते. 

नियोजित खर्च, जसे की, मुलांचे शिक्षण, कुटुंबासोबतची सहल, एखादी महागडी वस्तूची खरेदी करण्यासाठी नक्की कधी पैसे लागतील तुम्हाला आधीपासून माहिती असते. जर खर्च करण्यास काही अवधी शिल्लक असेल तर तात्पुरते पैसे गुंतवून चांगला व्याजदर मिळवू शकता.  

1 वर्षापर्यंत जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असेल तर कोणते पर्याय आहेत हे पाहूया. कारण, बचत खात्यात तसेच पैसे ठेवले तर जास्त व्याजदर मिळणार नाही. त्यापेक्षा कमी जोखीम असलेल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही अधिक परतावा मिळवू शकता. 

कॉर्पोरेट मुदत ठेवी (Corporate FD) 

कॉर्पोरेट मुदत ठेवी या बँक मुदत ठेवींपेक्षा जास्त जोखमीच्या असतात. त्यांना असुरक्षित मुदत ठेवी असे म्हटले जाते. कंपनी बुडाली तर व्याज आणि मुद्दलही जाऊ शकते. मात्र, चांगल्या रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट एफडीमध्ये 1 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येईल. यातून बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. 

ट्रिपल A रेटिंग असलेल्या कॉर्पोरेट एफडी जास्त सुरक्षित समजल्या जातात. ICICI होम फायनान्स FD 1 वर्ष कालावधीच्या गुंतवणुकीवर 7% व्याजदर देते. तर मनिपाल हाउसिंग फायनान्स सिंडिकेट कंपनी 1 वर्षाच्या एफडीवर 8.25% व्याजदर देते. एक वर्षाच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. 

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट 

पोस्ट ऑफिसच्या निश्चित कालावधी ठेव योजनांमध्येही तुम्ही 1 वर्ष कालावधीपर्यंत पैसे गुंतवू शकता. 1,2,3,4,5 वर्ष असे कालावधी टाइम डिपॉझिटसाठी निवडता येतो. तुम्ही अल्पकालावधी म्हणजे 1 वर्षासाठी पैसे गुंतवू शकता. टर्म डिपॉझिटमधून सहा महिन्यांच्या आता पैसे काढता येणार नाहीत. सहा महिन्यानंतर योजना बंद करत असाल तर पोस्टाच्या बचत खात्यातील दरानुसार व्याज मिळेल. 

टर्म डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केल्यास वर्षाच्या शेवटी व्याज मिळते. जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी पोस्टाच्या 1 वर्षाच्या टर्म डिपॉझिटवर 6.9% व्याजदर आहे. 

आवर्ती ठेवी (Recurring Deposits)

जर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर काही रक्कम बचत करायची असल्यास आवर्ती ठेवी हा एक पर्याय आहे. याद्वारे तुम्ही 6,9,12 असे टप्प्याने काही रक्कम RD मध्ये टाकू शकता. आवर्ती ठेवीमधील गुंतवणूक योजना परिपक्व झाल्यानंतर एकरकमी व्याज आणि मुद्दल मिळते. अनेक बँका ऑनलाइन RD मध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देतात. 

कमीत कमी सहा महिने ते 10 वर्षांपर्यंतची RD सुरू करता येऊ शकते. बँक FD वर जेवढे व्याजदर मिळते जवळपास तेवढेच व्याज RD योजनांवर मिळते. अधिक माहितीसाठी तुम्ही बँकांशी संपर्क साधू शकता. 

डेट म्युच्युअल फंड 

अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करताना डेट म्युच्युअल फंड हा एक कमी जोखमीचा पर्याय आहे. डेट म्युच्युअल फंडचे प्रकार पाहूया. 

लिक्विड फंड 

लिक्विड फंड योजना या ट्रेजरी बिल्स, कमर्शियल पेपर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, Lending & Borrowing Obligations सारख्या डेट आणि मनी मार्केट पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक अल्प कालावधी म्हणजे 91 दिवसांसाठी असते. या योजनांमधून पैसे तत्काळ काढता येतात. T+1 दिवसांत म्हणजेच रिक्वेस्ट केल्यानंतर पुढील कामकाजाच्या दिवशी पैसे मिळू शकतात. 

अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड - या योजनांमध्ये 3 ते 6 महिन्यांसाठी पैसे गुंतवता येतील. डेट आणि मनी मार्केटमध्ये योजनेतील पैसे गुंतवण्यात येतात. 

अल्प कालावधी फंड (लो ड्युरेशन फंड) - या योजनांमध्ये 1 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्ये योजनेद्वारे गुंतवणूक करण्यात येते. 

बँक मुदत ठेवी (Bank FD) 

बँक मुदत ठेवी 7,14,30, 45 दिवसांपासून 1 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतही असतात. प्रत्येक बँकेनुसार हा कालावधी बदलू शकतो. पाच लाख रुपयांच्या मुदत ठेवींना सरकारकडून विमा संरक्षणही मिळते. तसेच मासिक, तिमाही, सहामाई किंवा वार्षिक पद्धतीने तुम्ही व्याजदर घेऊ शकता. विविध बँका 1 वर्षापर्यंतच्या एफडीवर 3% ते 6% व्याजदर देतात. अल्पकालावधीसाठी विना जोखीम पैसे गुंतवण्यासाठी या पर्यायाचा विचार करू शकता.