मुदत ठेवीत गुंतवणूक करण्यास अनेकांचे प्राधान्य असते. कारण यात योग्य परतावा व सुरक्षिततेची हमी मिळते. इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये वाढती असुरक्षितता व अस्थिरतेपासून एफडी गुंतावणुकीला ग्राहकांनी पसंती दर्शविली आहे. गुंतवणूकदारांनी त्यांच्या गरजा योग्यरित्या समजून पैसे गुंतवले पाहिजेत. अनेक बँकांनी एफडी व पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट ठेवींच्या व्याजदरात सरकारने वाढ केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बँकेची एफडी की पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना यापैकी कोणता पर्याय निवडावा, हे समजून घेऊ.
Table of contents [Show]
गुंतवणूक करणे सोपे
बँक एफडी तसेच पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट या ठेवींमध्ये गुंतवणूक करणे सोपे आहे. दोन्ही ठेवींमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणे सोपे आहे. बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन एफडीमध्ये गुंतवणूक करता येते. मात्र पोस्ट ऑफिसच्या बाबतीत असे नसते. तुमचे खाते असलेल्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन त्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
दोन्ही पर्यायांमध्ये मिळते सुरक्षितता
पोस्ट ऑफिसमध्ये ठेवलेल्या ठेवीत परताव्याची हमी असते. कुठल्याही परिस्थितीत पैसे परत करणे ही सरकारची जबाबदारी असते. दुसरीकडे, 5 लाख रुपयांपर्यंतच्या बँक ठेवींचा विमा डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) द्वारे केला जातो. त्यामुळे, दोन्ही मुदत ठेवी तुमच्या गुंतवणुकीला उच्च पातळीची सुरक्षा प्रदान करतात.
कालावधीनुसार एफडी गुंतवणूक ठरते फायदेशीर
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट ठेवीत 1 वर्ष आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. बँक एफडीमध्ये, तुम्ही किमान 7 दिवसांसाठी गुंतवणूक करू शकता आणि जास्तीत जास्त 10 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. बँक एफडी गुंतवणूक मुदतीच्या निवडीच्या बाबतीत अधिक सुलभ असते. कारण तुम्ही 1 वर्षापेक्षा कमी आणि 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी देखील यात गुंतवणूक करू शकता.
FDचे नवीन व्याज दर
देशातील सर्वात मोठी बँक SBI एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 6.8 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर एसबीआयचा व्याज दर 7% झाला आहे. मे, 2022-मार्च, 2023 या कालावधीत रेपो दरात झालेल्या वाढीनुसार व्याजदरात देखील वाढ झाली आहे.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिटचे नवीन व्याजदर
लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ झाल्यानंतर, 2 वर्ष कालावधीच्या पोस्ट ऑफिस मुदत ठेवीवर आता 6.9% व्याजदर मिळणार आहे. सप्टेंबर 2022 मध्ये हा दर 5.5 % होता.
www.zeebiz.com