Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning: गुंतवणूक करताना नुकसान टाळायचे आहे? आर्थिक सल्लागाराची मदत घेतल्यास होतील ‘हे’ फायदे

Financial Advisor

Image Source : https://www.freepik.com/

गुंतवणुकीत होणारे नुकसान टाळायचे असल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे. आर्थिक सल्लागाराची मदत घेतल्यास भविष्यात नुकसान होणार नाही.

गुंतवणूक करताना सर्वसाधारणपणे सोने, जमीन व बँकेतील फिक्स्ड डिपॉजिटला अजूनही प्राधान्य दिले जाते. मात्र, आता गुंतवणुकीची अनेक माध्यम उपलब्ध झाली आहेत व यातून मिळणारा परतावा देखील असतो. परंतु, अपुऱ्या माहितीमुळे अशा गोष्टीत गुंतवणूक करणे टाळले जाते. विशेष म्हणजे अनेकजण गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेत नाहीत.

तुम्ही अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करत असा अथवा दीर्घ मुदतीसाठी, आर्थिक सल्लागाराकडून याबाबत घेतलेला सल्ला तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. यामुळे गुंतवणूक करताना येणाऱ्या अडचणी व भविष्यात होणारे नुकसान देखील टाळले जाऊ शकते.

आर्थिक सल्लागाराची मदत कधी घ्यावी?

माहितीचा अभाव – समजा, तुम्ही अल्पकालीन मुदतीचा विचार करत आहात. मात्र, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक करत आहात त्याबाबत संपूर्ण माहिती नसल्यास आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते. यातील तज्ञ व्यक्ती तुम्हाला वेगवेगळे गुंतवणुकीचे प्रकार, त्यातील जोखीम व परतावा याबाबतची सविस्तर माहिती देऊ शकेल.

उत्पन्नाचे अनेक मार्ग – तुमचे उत्पन्नाचे अनेक मार्ग असल्यास गुंतवणुकीबाबत गोंधळ निर्माण होऊ शकतो. तसेच, तुमच्यावर कर्ज असेल अथवा तुम्ही याआधीही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केलेली असल्यास अशा स्थितीमध्ये भांडवलाचे योग्य व्यवस्थापन करणे अडचणीचे ठरते. अशावेळी आर्थिक सल्लागार तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो. सल्लागार तुमचे उत्पन्न, खर्च या गोष्टी लक्षात घेऊन योग्य गुंतवणूक कशात करावी हे सांगू शकेल.

किचकट गुंतवणूक- तुम्ही अल्प मुदतीसाठी शेअर्स, ऑप्शन्स- फ्यूचर्स, फॉरेन एक्सचेंज ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अपुऱ्या माहितीमुळे हे जोखमीचे ठरू शकते. यामध्ये गुंतवणूक करताना कधीही आर्थिक सल्लागाराची मदत घेणे उपयोगी ठरते.

नुकसान टाळण्याची गरज – कोणतीही गुंतवणूक करताना त्यातील धोका जाणून घेणे गरजेचे असते. अल्प मुदतीच्या गुंतवणुकीत परतावा जास्त मिळत असला तरीही नुकसान देखील मोठे होऊ शकते. आर्थिक सल्लागार तुमचे हे नुकसान टाळून तुम्हाला आर्थिक उद्देशांपर्यंत पोहचण्यास मदत करतो.

करात सूट- बरेचजण करात सूट मिळावी या दृष्टीने देखील गुंतवणूक करतात. मात्र, नेमकी गुंतवणूक कशात केल्याने जास्त सूट मिळेल हे अनेकांना माहित नसते. अशावेळी आर्थिक सल्लागार कामी येते. आर्थिक सल्लागारांना नियम-अटी, कायद्यांची योग्य माहिती असते. ते तुम्हाला योग्य सल्ला देऊन करात सूट मिळवण्यास मदत करतात. त्यामुळे कधीही गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराची मदत घेणे फायदेशीर ठरते.

योग्य आर्थिक सल्लागाराची करा निवड

कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे याबाबत सल्ला घेताना योग्य व्यक्तीची निवड करणे गरजेचे असते. तुमच्या आर्थिक गुंतवणुकीसाठी आर्थिक सल्लागाराची निवड करताना त्या व्यक्तीचे शिक्षण, क्षेत्रातील अनुभव किती आहे हे जाणून घ्या. तुम्हाला ज्या क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे, त्याबाबत आर्थिक सल्लागाराला संपूर्ण ज्ञान आहे का हे तपासा. याआधी त्या सल्लागाराकडून सल्ला घेतलेल्या व्यक्तीकडून फिडबॅक घ्या व त्यानंतरच त्यांची निवड करा.