70-10-10-10 Budget Rule: कितीही कमवले तरी महिनाअखेरीस हातात काहीच उरत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. अशा वेळी नक्की खर्च कुठे होतोय आणि बचत कशी करावी, हेच समजत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी आणि स्वतःचे बजेट सुधारण्यासाठी सध्या '70-10-10-10' हा नियम खूप लोकप्रिय ठरत आहे.
बजेट बनवणे म्हणजे पैशांची चणचण सोसणे नव्हे, तर आपल्या कमाईचा आणि खर्चाचा योग्य ताळमेळ लावणे होय. या सोप्या नियमाचा वापर करून तुम्ही तुमच्या पगारातील प्रत्येक रुपयाचा अचूक हिशोब लावू शकता आणि भविष्यासाठी मोठी रक्कम उभी करू शकता.
समजून घ्या 70-10-10-10 चा नियम
या पद्धतीचा मूळ मंत्र म्हणजे पगार हातात येताच सर्वात आधी स्वतःसाठी पैसे बाजूला काढणे. तुमचे उत्पन्न किंवा पगार बँक खात्यात जमा होताच, त्याचे खालीलप्रमाणे 4 भागांत विभाजन करा:
10% रक्कम (गुंतवणूक): तुमच्या कमाईचा हा 10% हिस्सा शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा सोन्यासारख्या ठिकाणी गुंतवा, जो भविष्यात तुमची संपत्ती वाढवेल.
10% रक्कम (बचत): हा भाग भविष्यातील अचानक येणाऱ्या खर्चासाठी किंवा 'इमर्जन्सी फंड' म्हणून बँकेत सुरक्षित बाजूला काढून ठेवा.
10% रक्कम (दानधर्म): उर्वरित 10% हिस्सा गरजू लोकांना मदत करण्यासाठी किंवा सामाजिक कार्यासाठी वापरा.
70% रक्कम (रोजचा खर्च): तुमच्या एकूण पगारातील 70% हिस्सा घरखर्च, किराणा, घराचे भाडे, प्रवास, विमा आणि लाईट बिलासारख्या रोजच्या अत्यावश्यक गोष्टींवर खर्च करण्यासाठी वापरा.
या सोप्या वाटणीमुळे तुमच्या रोजच्या गरजा तर पूर्ण होतीलच, शिवाय भविष्यासाठी पैशांची चांगली सोय होईल.
सुरुवातीला जमत नसेल तर काय करावे?
हा नियम ऐकायला खूप चांगला वाटतो, पण जर तुमचा आजचा घरखर्चच 90% च्या आसपास असेल, तर राहिलेले नियम कसे पाळायचे, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. अशा वेळी सुरुवातीलाच हे कडक नियम पाळण्याची घाई करू नका.
हळूहळू करा सुरुवात: तुम्ही सध्या ज्या परिस्थितीत आहात, तिथूनच सुरुवात करा. कदाचित सुरुवातीचे काही महिने तुम्हाला 85-5-5-5 अशा पद्धतीने बजेट जमू शकेल आणि त्यात काहीच गैर नाही.
बदला लहान सवयी: एकदा का तुम्ही पैशांचे नियोजन करायला सुरुवात केली, की तुमच्या सवयी आपोआप बदलू लागतील. बाहेरचे जेवण कमी करणे, विनाकारण कपड्यांची खरेदी टाळणे, अनावश्यक वीज बिल वाचवणे अशा गोष्टी तुम्ही स्वतःहून करू लागाल.
मुख्य गोष्ट म्हणजे फक्त सुरुवात करणे. एकदा ही सवय तुमच्या जीवनशैलीचा भाग बनली की, काहीच दिवसांत तुमचे पैशांचे टेन्शन पूर्णपणे गायब होईल.