भारतात आर्थिक घोटाळ्यांची यादी बरीच मोठी आहे. हर्षद मेहतापासून ते 2जी घोटाळ्यापर्यंत अनेक कोट्यावधी रुपयांचे घोटाळे समोर आले आहेत. त्यातही एखाद्या राजकीय नेत्याचे नाव त्यात समोर आले तर अशा घोटाळ्यांची विशेष चर्चा होते. असाच एक मोठा घोटाळा 1970 च्या दशकात समोर आला होता. विशेष म्हणजे या घोटाळ्यात गुन्हेगारांकडून चक्क तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाचा वापर करण्यात आला होता. हा घोटाळा म्हणजे नागरवाला प्रकरण.
इंदिरा गांधींच्या नावाखाली उकळले 60 लाख
24 मे 1971. दिल्लीच्या संसद भवन येथील एसबीआयच्या ब्रँचमध्ये एक फोन येतो. फोन उचलणारी व्यक्ती वेद प्रकाश मल्होत्रा ही बँकेची कॅशियर असते. तर समोर फोनवर समोरून बोलणारी व्यक्ती स्वतःची ओळख तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव ‘पीएन हक्सर’ म्हणून करून देते.
हक्सर बांगलादेशच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या गुप्त ऑपरेशनसाठी 60 लाख रुपयांची गरज असल्याचे मल्होत्रा यांना सांगतात. एवढेच नाही तर त्यानंतर एक महिला देखील इंदिरा गांधी असल्याचे सांगत मल्होत्रा यांच्याशी फोनवर संवाद साधते
ही महिला मल्होत्रा यांना बँकेतून 60 लाख रुपये काढून स्वतः बायबल भवन जवळ घेऊन यायला सांगते. तसेच, पैसे घेणारी व्यक्ती ‘बांगलादेश का बाबू’ हा कोडवर्ड सांगेल व त्याला उत्तर देताना ‘बार अॅट लॉ’ हा को़ड सांगून पैसे देण्यास सांगते.
मल्होत्रा देखील आदेशाचे पालन करत बँकेतून 60 लाख रुपये काढतात व थेट बायबल भवन गाठतात. येथे मल्होत्रा कोडवर्ड सांगणाऱ्या व्यक्तीला गाडीत बसवते. ती व्यक्ती पैसे घेते व मल्होत्रा यांना पीएम हाउसवर जाऊन वाउचर घेण्यास सांगते. मात्र, पीएम हाउसवर गेल्यावर तेथे इंदिरा गांधींशी यांच्याशी त्यांची भेट होत नाही.
अन् नागरवालाला झाली अटक
पीएम हाउसवर इंदिरा गांधींशी भेट न झाल्याने मल्होत्रा संसद भवनावर पोहचतात. येथेही इंदिरा गांधीशी भेट होत नाही. मात्र, पीएन हक्सर यांच्याशी बोलणे होते. परंतु, हक्सर पूर्ण घटनाक्रम ऐकून आश्चर्यचकित होतात व आपण असा कोणताही फोन केला नसल्याचे सांगतात. अखेर मल्होत्रा यांच्या फसवणूक झाल्याचे लक्षात येते व ते एफआयर दाखल करतात.
बँकेतून अचानक 60 लाख रुपये गायब होणे व त्यात या प्रकरणाशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नाव जोडले गेल्याने संपूर्ण दिल्लीत खळबळ उडते. अखेर पोलीस चक्र फिरवतात व पैशांचा तपास करण्यासाठी टीम तयार करतात. या ऑपरेशनला नाव देतात ‘ऑपरेशन तूफ़ान’.
पोलिसांचा तपास टॅक्सी चालकापासून सुरू होतो. पैसे घेतल्यानंतर ती व्यक्ती टॅक्सीमध्ये बसून जुन्या दिल्लीत उतरते. येथे त्या टॅक्सी वाल्याला 500 रुपये देते. अखेर या माहितीच्या आधारावर पोलिस पारसी धर्मशाला येथून त्या व्यक्तीला अटक करते. तर त्या व्यक्तीच्या मित्राकडून 59 लाख 95 हजार रुपये जप्त करते.
4 वर्षांची शिक्षा आणि मृत्यू
पुढे पोलिसांच्या तपासात अटक केलेल्या व्यक्तीचे नाव रुस्तम सोहराब नागरवाला असल्याचे समोर येते. ही व्यक्ती भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर आणि भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’मध्येही काम करत होती. शेवटी नागरवाला स्वतःचा गुन्हा मान्य करतो व इंदिरा गांधींचा बनावट आवाज काढून पैसे उकळल्याचे कबूल करतो. कॅशिअर वेद प्रकाश मल्होत्रा यांना निलंबित करण्यात येते.
केवळ 10 मिनिटं खटला चालवल्यानंतर नागरवाला यांना 4 वर्ष जेल व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा होते. पुढे नागरवाला आपण गुन्हा केला नसल्याचे सांगत पुन्हा खटला चालवण्याची मागणी करतात. मात्र त्याची मागणी मान्य केली जात नाही. काही दिवसांनी या घटनेचा तपास करणारे प्रमुख पोलिस अधिकारी SSP डीके कश्यप यांचाही अपघातात मृत्यू झाल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत येते.
फेब्रुवारी 1972 मध्ये नागरवालाला तब्येत बिघडल्याने तिहार जेलमधून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येते. मात्र, नंतर उपचारादरम्यानच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू होतो. पुढे इंदिरा गांधी यांची सत्ता जाते व सत्तेत आलेली जनता पार्टी या प्रकरणाचा सखोल चौकशी करण्याचा आदेश देते. यासाठी जगनमोहन रेड्डी आयोग स्थापन्यात येतो. मात्र, या प्रकरणात पुढे कोणतीही ठोस माहिती समोर येत नाही.