काळानुरुप बदलायला हवे, असा सल्ला प्रत्येकजण देतो. तंत्रज्ञानापासून ते फॅशनपर्यंत, बदलत्या ट्रेंडला स्विकारणे गरजेचे असते. मात्र, अनेकदा नवनवीन ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात नुकसान होण्याचीही शक्यता असते. ‘फास्ट फॅशन’ हा असाच एक ट्रेंड आहे, ज्याचे मोठे आर्थिक व पर्यावरणीय परिणाम पाहायला मिळतात. फास्ट फॅशन म्हणजे नक्की काय व याचा कशाप्रकारे परिणाम होत आहे? याबाबत या लेखामधून समजून घेऊया.
फास्ट फॅशन म्हणजे काय?
नवीन कपडे खरेदी करायला प्रत्येकाला आवडते. काहीवर्षांपूर्वी आपण एखादा सण अथवा घरात काहीतरी कार्यक्रम असल्यावरच कपडे खरेदी करायचो. मात्र, आता कपडे खरेदी करण्यासाठी खास दिवसाची गरज भासत नाही. बाजारात नवीन ट्रेंड आला की आपण कपडे खरेदी करतो.
सोशल मीडिया इन्फ्लूएंसर, सेलिब्रेटी दर आठवड्याला नवनवीन व हटके स्टाइलसह येणारे कपडे परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर टाकताना तुम्ही पाहिले असेल. हा ट्रेंड फॉलो करून इतर लोकही अशाच प्रकारचे कपडे खरेदी करतात. बदलत्या ट्रेंड्सला ग्राहकांकडून प्रतिसादही मिळतो. ग्राहकांची हीच मागणी बघून अनेक मोठमोठ्या कंपन्या दर आठवड्याला अगदी कमी दरामध्ये उपलब्ध होणारे स्टाइलिश कपडे बाजारात आणतात
थोडक्यात, लवकरात लवकर, कमी दरात मोठ्या प्रमाणात नवीन स्टाइल्सचे कपडे बाजारात आणणे म्हणजे फास्ट फॅशन होय. 1990 च्या दशकात हा शब्द सर्वात प्रथम चर्चेत आला. मात्र, गेल्याकाही वर्षात पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांमुळे फास्ट फॅशनची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.
Zara, H&M, Uniqlo, Shein सह जगभरातील टॉप कंपन्या या फास्ट फॅशनचा भाग आहेत. जगभरातील फास्ट फॅशनचे मार्केट तब्बल 60.50 अब्ज डॉलर्सचे असून, 2030 पर्यंत हा आकडा 180 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. भारताचा विचार केल्यास, सध्या देशातील फास्ट फॅशनचे मार्केट हे जवळपास 10 अब्ज डॉलर्सचे आहे. तर 2023 पर्यंत तब्बल 29 अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या कापड आणि वस्त्र उत्पादक देशांपैकी एक आहे. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा 2.3 टक्के वाटा आहे.
फास्ट फॅशनमुळे पर्यावरणावर कशाप्रकारे परिणाम होतोय?
बदलत्या ट्रेंडनुसार कंपन्यांकडून बाजारात दरआठवड्याला नवीन कपडे आणले जातात. विशेष म्हणजे ग्राहकांकडूनही त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळतो. मात्र, यामुळे जुन्या कपड्यांचे रुपांतर हे कचऱ्यामध्ये होते. फॅशन उद्योगाद्वारे दरवर्षी सुमारे 53 दशलक्ष टन फायबरची निर्मिती होती, ज्यातील 70 टक्के कचऱ्यात रुपांतरित होते किंवा जाळले जाते. केवळ 1 टक्के फायबरचा पुन्हा कपडे निर्मितीसाठी वापर होतो.
याशिवाय, नवीन कपडे बनवतानाच्या प्रक्रियेमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) एका रिपोर्टनुसार, वार्षिक जागतिक कार्बन उत्सर्जनात फॅशन उद्योगाचा वाटा 10 टक्के आहे.
तसेच, स्वस्त कपड्यांच्या निर्मितीसाठी कंपन्यांकडून पॉलिस्टरसारख्या पेट्रोलियम फायबरचा वापर केला जातो. पॉलिस्टरला पूर्णपणे नष्ट होण्यासाठी जवळपास 200 वर्ष लागतात. याशिवाय, रासायनिक पदार्थ, कपडे निर्मितीसाठी चमड्याचा वापर देखील केला जातो. यामुळे कार्बन उत्सर्जनात वाढ होऊन पर्यावरणाला हानी पोहचत आहे.
फास्ट फॅशनचे आर्थिक परिणाम काय आहेत?
फास्ट फॅशनमुळे कपड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. ग्राहकांकडूनही कपड्यांवर प्रचंड खर्च केला जातो. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, या कंपन्यांकडून कपड्यांच्या निर्मितीसाठी भारत, पाकिस्तान, बांगलादेश सारख्या देशांना प्राधान्य दिले जाते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे या देशांमध्ये कमी वेतनात उपलब्ध होणारे मजूर. या मजूरांचे वेतन एवढे कमी असते की ते स्वतःचा दैनंदिन खर्चही पूर्ण करू शकत नाहीत. एकीकडे फास्ट फॅशनमुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होत असल्यातरीही पर्यावरणाचे नुकसान होत आहे.
भारतात कपडे खरेदीवर प्रचंड पैसा खर्च केला जातो. भारतात 2018 मध्ये कपड्यावर दरडोई 3900 रुपये खर्च केले जात होते. 2023 मध्ये हा आकडा 6400 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या वेगवेगळ्या शहरांमध्ये नवीन स्टोअर उघडत आहेत. भारतीय फास्ट फॅशन बाजारात H&M कंपनीचे वर्चस्व पाहायला मिळते. 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने 2960 कोटी रुपयांची विक्री केली आहे. तसेच, मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीमध्ये तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.