भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) म्हणजेच एलआयसीच्या आयपीओची (IPO) गुंतवणूकदार अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. गुंतवणूकदारांची ही प्रतिक्षा संपली असून 4 मे रोजी एलआयसी कंपनी आयपीओ बाजारात आणण्याची शक्यता आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. हा आयपीओ ओपन कधी होणार, त्याचे लिस्टिंग, शेअर्सची किंमत, लॉट साईज याबरोबरच आयपीओ म्हणजे नेमकं काय? कंपन्यांकडून आयपीओ का आणले जातात आणि त्यात गुंतवणूक कशी करावी याविषयी आपण जाणून घेऊया.
आयपीओ म्हणजे काय? What is IPO?
सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास विविध कंपन्यांकडून निधी उभारणीसाठी अवलंबला जाणारा पर्याय म्हणजे आयपीओ (IPO), असे म्हणता येईल. एखादी कंपनी जेव्हा प्रथमच त्यांचे शेअर्स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देते, त्या प्रक्रियेला आयपीओ म्हटले जाते. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपन्यांकडून आयपीओ आणून निधी जमा केला जातो.
LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात
1. एलआयसी आयपीओ कोणत्या दिवशी खुला आणि बंद होणार?
एलआयसीचा आयपीओ 4 मे रोजी नोंदणीसाठी खुला होणार असून 9 मे रोजी बंद होईल.
2. आयपीओतून सरकार किती निधी उभारू इच्छित आहे?
सरकार आयपीओद्वारे सुमारे 21000 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.
3. प्रति समभागांची किंमत काय असेल?
सार्वजनिक भागविक्रीसाठी गुंतवणूकदारांना प्रति समभाग 902 ते 949 रूपयांपर्यंत बोली लावता येणार आहे.
4. आयपीओचा लॉट साइज किती असेल?
एलआयसी आयपीओच्या एका लॉटमध्ये 15 शेअर्स असू शकतात.
5. सरकार कंपनीतील किती टक्के मालकी विकण्याचा विचार करत आहे?
विम्याची संपूर्ण मालकी असलेल्या कंपनीतून सरकार सध्या 3.5 टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. अगोदर सरकार 5 टक्के हिस्सा विकण्याचा विचार करत होते. पण बाजाराच्या सद्यस्थितीमुळे सरकारने 5 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.
6. एलआयसी कंपनीचे मूल्य किती आहे?
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अॅक्च्युरिअल संस्थेने एलआयसीचे मूल्यांकन केले असून त्यांनी एलआयसीचे मूल्य 5.4 लाख कोटी रुपये ठरवले आहे.
7. एलआयसीचे बाजारमूल्य किती आहे?
एलआयसीचे बाजार मूल्य 6 लाख कोटी असेल. त्याच्या प्रत्यक्ष मूल्यांकनाच्या तुलनेत हे 1.1 पटीने अधिक आहे.
8. पॉलिसीधारकांना विशेष सवलत आहे का?
एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी प्रति समभाग 60 रूपये आणि किरकोळ गुंतवणूक आणि कर्मचाऱ्यांसाठी 40 रूपयांची सूट असणार आहे.
9. एलआयसीच्या आयपीओ खरेदीसाठी मोठे गुंतवणूकदार आले आहेत का?
मोठ्या गुंतवणूकदारांनी सुमारे 13 हजार कोटींची गुंतवणूक करण्याची हमी एलआयसीला दिली आहे.
10. भारतीय इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ आहे का?
3.5 टक्के समभाग विक्रीसह, एलआयसी आयपीओ हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयपीओमध्ये पेटीएम (18,300 कोटी), कोल इंडिया (15,500 कोटी) आणि रिलायन्स पॉवर (11,700 कोटी) यांचा समावेश आहे.