आज (दि. 17 जून) इयत्ता दहावीचा रिझल्ट (SSC Result 2022) लागला तर काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल (HSC Result 2022) लागला होता. तसा हा निकाल निव्वळ मार्कांपुरताच असतो. कारण दहावी- बारावीनंतर काय करायचं हे परीक्षा संपल्यानंतर लगेचंच ठरवलं जातं. सध्या जगभरात करिअरचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांबरोबर संधीही तितक्याच आहेत. पण या सर्व क्षेत्रांच्या स्वत:च्या काही गरजा आहेत. त्या लक्षात घेऊन करिअरची निवड करणे योग्य ठरू शकते. आज आपण येणाऱ्या काळात आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या टॉप 5 क्षेत्रांबद्दल जाणून घेणार आहोत.
या जगात अशी एकही व्यक्ती सापडणार नाही; ज्याला सर्वाधिक पैसे कमवायचे नाहीत. चुकून एखादी सापडली तर ती व्यक्ती ढोंगी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आपल्या समाजाची व्यवस्था आणि एकूण जगाची व्यवस्था ही पैशांभोवती बांधली गेली आहे. तुम्ही जर चांगले पैसे कमवू शकला, तरच चांगले आयुष्य जगू शकाल. चला तर अशाच काही क्षेत्रांबद्दल समजून घेऊ.
1. आर्थिक सेवा (Financial Services)
विविध आर्थिक अहवालानुसार, आर्थिक सेवा उद्योगांमधून सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती तयार झाल्याचे दिसून येते. फायनान्शिअल सेक्टरमधून पैसे मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत; आणि त्यातून अनेकांनी चांगले पैसेही कमावले. फायनान्समध्ये करिअर करणं म्हणजे या क्षेत्रातून तुम्हाला वैयक्तिकरीत्या काय हवे आहे, यावर अवलंबून आहे. कारण फायनान्स फिल्ड हा फक्त एक कोर्स किंवा करिअरचं फिल्ड नाही. तर ती प्रत्येक समाजाची गरज आहे. ढोबळमनाने पल्बिक फायनान्स, कॉर्पोरेट फायनान्स (गुंतवणूक) आणि बिझनेस किंवा सेल्स या तीन क्षेत्रांमध्ये (सरकारी आणि खाजगी) करिअरसाठी भरपूर स्कोप आहे.
2. तंत्रज्ञान (Technology)
सर्वात जास्त लखपती तयार करण्यात आर्थिक सेवा क्षेत्रापेक्षा तंत्रज्ञान हे फिल्ड अग्रेसर आहे. तसे पाहायला गेले तर दोन्ही फिल्ड एकमेकांसाठी पूरक आहेत. फायनान्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या एकत्र येण्यामुळे फायनान्स फिल्डमध्ये जी काय प्रगती झाली आहे. ती आश्चर्यचकित करणारीच आहे. या दोन्ही सेवा म्हणजेच फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रांसाठी इंजिन बनल्या आहेत.
टेक्नॉलॉजी, ही सध्याच्या तरूणाच्या गळ्यातील ताईत बनली आहे. आज जगातील टॉप 10 कंपन्या पाहा. त्यातील 10 पैकी 6 कंपन्या टेक्नॉलॉजीवर आधारित आहेत. टेक्नॉलॉजी अशी गोष्टी आहे की, ती कृषि, फायनान्स, मिडिया, हेल्थ आणि किरकोळ व्यावसायिकांसाठी अत्यंत गरजेची आहे.
3. रिअल इस्टेट आणि बांधकाम (Real Estate & Construction)
रिअल इस्टेट हा वर्षानुवर्षांपासून संपत्ती वाढवण्याचा आणि गुंतवणुकीचा जुना आणि खात्रीशीर मार्ग मानला जातो. आजही या क्षेत्राला तितकीच मागणी आहे. अर्थात जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना या जमिनींवर उभे राहणारे बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्राला इथून पुढेही आणखी मागणी असणार आहे. बहुतेक श्रीमंत लोक रिअल इस्टेटमधून श्रीमंत झाले आहेत. इथे फक्त बिल्डर किंवा बांधकाम व्यावसायिक इतकाच मर्यादित स्कोप नाही. रिअल इस्टेट उद्योगाशी संबंधित जमिन संपादित करण्यापासून त्यावरील बांधकाम, देखभाल, व्यवस्थापन, इतर व्यावसायिक सेवा अशी मोठी साखळी या व्यावसायाशी संबंधित आहे.
4. फूड आणि बिव्हरेजेस (Food & Beverages)
आपल्या जगाची लोकसंख्या 7 अब्जाहून अधिक आहे. याचा अर्थ असा की, खाणारी तोंडेही 7 अब्ज आहेत. 2030 पर्यंत त्यात आणखी 1 अब्ज लोकसंख्येची वाढ होईल आणि 2050 पर्यंत, 9.7 अब्ज लोकांची खाद्यपदार्थांची गरज भागवावी लागणार आहे. आजही आपल्याकडे प्रत्येकाला पुरेल इतके अन्न तयार केले जात नाही. पण प्रत्येक माणसाची किमान अन्नाची गरज भागवणे ही या क्षेत्राची गरज आहे; आणि उद्योग-व्यवसायाच्या दृष्टिने संधी सुद्धा आहे.
5. आरोग्य (Health Industry)
आरोग्य हीच एक माणसासाठी मौल्यवान संपत्ती आहे. कारण आरोग्यच व्यवस्थित नसेल तर माणूस काहीच करू शकत नाही. कोविडमुळे आरोग्यसेवेचं महत्त्व सर्वांना पटले आहे. आरोग्य सेवा व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. त्यामुळे हेल्थ सेक्टर हा सध्या घडीला अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. जागतिक पातळीवर फार्मास्युटिकल उद्योगाचा पसारा एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आहे; आणि तो हेल्थ सेक्टर फक्त एक भाग आहे. यावरून तुम्ही विचार करू शकता की, संपूर्ण हेल्थ सेक्टर हा आर्थिक बाजूंनी बांधलेला आहे. या क्षेत्रात पैसे मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध आहे.
इथे दिलेली करिअरची क्षेत्र ही फक्त पैसे मिळवणारी क्षेत्र आहेत; असे नाही. या क्षेत्रांना सध्या मागणी आहे. त्यात अनेक बदल होत आहेत. त्यामुळे संधीही भरपूर आहे. पण या क्षेत्राशी संबंधित विविध उपशाखा येणाऱ्या दिवसात वाढणार आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या आवडीचे क्षेत्र निवडून यातून पैशांसोबत मानसिक समाधान मिळवू शकाल.