कारचा विमा काढत असताना आपण तो सर्वसमावेशक असेल याबाबत पडताळणी करूनच त्यासाठी पैसे खर्च करतो. याच बरोबर विमा काढत असताना विम्याचा हप्ता कमीत कमी असावा हे देखील पाहतो. यासाठी कार विम्याच्या किमतीवर कोणकोणते घटक प्रभाव टाकतात याची जर तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या खर्चाच बचत होऊ शकते. त्यामुळे आज कार विमा पॉलिसीच्या प्रिमियमवर कोणकोणत्या घटकाचा परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला कशा प्रकारे विमा कव्हरेजशी तडजोड न करता स्वस्तात विमा पॉलिसी घेता येऊ शकेल या गोष्टी जाणून घेऊ..
कार विम्याची किंमत ठरवताना कंपनीकडून अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने कारचे बाजार मूल्य, कारचा चालक, कारसाठी वापरण्यात येणारे इंधन, विम्याचे नो क्लेम बोनस यासह विमा कंपनीची मेंबरशीप याचा विचार केला जातो. या गोष्टीचा कारच्या प्रिमियमवर कसा पडतो हे आपणास पुढील गोष्टीवरून स्पष्ट होईल.
कार चालक-
कार विमा ऑनलाइन खरेदी करताना, प्रिमियमवर लक्षणीय परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे कारचा चालक. मात्र, कारचा पहिल्यादाच विमा खरेदी करत असाल तर याचा जास्त प्रभाव पडत नाही. मात्र कारचा विमा ऑनलाईन नूतनीकरण असाल तर चालकाचा विचार केला जातो. कारण कार विमा हा वाहन मालकीचा एक महत्त्वाचा पैलू आहे, जो अनपेक्षित अपघात आणि नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्रदान करतो. जर कारचा चालक अनुभवी असेल तर अपघाताची जोखीम कमी असते अशावेळी विमा कंपनी कार चालकाच्या अनुभवाचा आणि त्याच्या मागील रेकॉर्ड विचारात घेते आणि विमा प्रिमियममध्ये सवलत देते. या उलट नवखा चालक असेल किंवा एखाद्या चालकाचे अपघाताबाबत रेकॉर्ड खराब असेल तर कंपनी विमा आकारताना जास्त प्रिमियम आकारते.
तसेच कारचा प्राथमिक चालक कोण आहे? मालक आहे की दुसरी व्यक्ती याचाही विचार कंपनीकडून केला जातो. एखाद्यावेळी विमा दावा दाखल केल्यास कारचा प्राथमिक चालक कार चालवत होता की दुसरा कोणी याची खात्री केली जाते. जर दुसरा कोणी वाहन चालवत असेल तर त्याचा विम्याच्या दाव्यावर परिणाम होऊ शकतो.
कारचे बाजार मूल्य (IDV)
तुमच्या कारचा विमा (Vehicle Insurance) काढत असताना एक मूल्य निश्चित केले जाते. त्याला IDV असे संबोधले जाते. त्यानुसार त्यानुसार तुमच्या दाव्याचे भरपाई मुल्य ठरवले जाते. त्याच प्रमाणे कार विमा पॉलिसीची किंमत ठरवताना तुमच्या कारचे बाजारमुल्य देखील विचारात घेतले जाते. जर तुमच्या कारचा IDV जास्त असेल तर तुमचा विमा पॉलिसीचा खर्चही जास्त असतो. तसेच बाजार मूल्य कमी असेल तर प्रिमियम खर्च देखील कमी येतो.
कारचा इंधन प्रकार
कारच्या विमा पॉलिसीची किंमत ठरवताना कार कोणत्या इंधनावर चालते याचा देखील प्रभाव पडू शकतो. कारच्या वेगवेगळ्या इंधन प्रकारामुळे कारचे बाजारमुल्य हे समान नसते. तसेच CNG इंधनावर चालणाऱ्या कारसाठी सीएनजी कीटचा विमा पॉलिसीमध्ये समावेश करण्यात येत असल्याने प्रिमियमच्या खर्चात वाढ होऊ शकते.
वेगवेगळ्या कंपनीच्या सवलतीचा लाभ
काही विमा कंपन्याकडून ग्राहकांना वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. त्यामध्ये विमा कंपन्याचे सदस्यत्व अथवा एखाद्या असोसिएशनचे सदस्य असल्यास असल्यास विमा पॉलिसीच्या किमतीमध्ये काही टक्क्यांची सवलत मिळू शकते.
नो क्लेम बोनस-
जर तुम्ही तुमच्या कारचा विमा रिन्यू करत असाल आणि मागील पॉलिसी कालावधीत एकही दावा केला नसेल तर तुम्हाला नो क्लेम बोनसचा फायदा मिळू शकतो. विमा कंपन्या कार विमा नूतनीकरणावेळी NCB लागू होत असल्यास प्रीमियमवर सूट देतात.