Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fish Farming: कमी गुंतवणुकीमध्ये स्वतःचा मत्स्यपालन व्यवसाय कसा सुरू कराल? जाणून घ्या

Fish Farming

Image Source : https://www.freepik.com/

शेतीसोबतच अनेकजण मत्स्यपालन व्यवसायाकडे वळत आहे. तुम्ही देखील कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता.

शेतीमधून उत्पन्न मिळत नाही म्हणून अनेकजण शेतीपूरक व्यवसायाकडे वळताना दिसतात. ग्रामीण भागात अनेकजण आता शेतीसोबतच कुक्कुटपालन, मत्स्यपालन व्यवसाय देखील करत आहेत. तुम्ही देखील कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता. मत्स्यपालन व्यवसायासाठी किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे व यातून कशाप्रकारे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकता, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.  

व्यवसायाबात जाणून घ्या संपूर्ण माहिती

कोणत्याही व्यवसायत उतरण्याआधी त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. मत्स्यपालन व्यवसायाला देखील हे लागू पडते. सुरुवातीच्या टप्प्यात कमी गुंतवणुकीत छोट्या स्तरावार हा व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरेल. 

व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही बाजारातील मागणी जाणून घेणे गरजेचे आहे. बाजारात कोणत्या माशांच्या प्रजातींची सर्वाधिक विक्री होते, त्या आधारावर तुम्ही मत्स्यपालन सुरू करू शकता. याशिवाय पाणी, विजेची सुविधा असणे गरजेचे आहे. तसेच, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागा असणे देखील आवश्यक आहे. अशी संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

किती गुंतवणूक करावी लागेल?

मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज असते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये असणे गरजेचे आहे. सर्वाधिक खर्च हा शेततळ्याच्या जागेसाठी येतो. तुमच्याकडे जर स्वतःची जागा असल्यास हा खर्च वाचवू शकता. अन्यथा तुम्हाला जागा भाड्याने घ्यावी लागेल. 

शेततळ्याच्या निर्मितीसाठी तुम्हाला 50 हजार ते 1 लाख रुपये खर्च करावा लागेल. शेततळ्याची बांधणी, पाणीपुरवठा, ड्रेनेजसाठी तुम्हाला खर्च येईल. माशांसाठी खाद्य, बियाणे, सेंद्रीय खते इत्यादी खरेदी करावे लागेल. तसेच, दरमहिन्याला येणाऱ्या पाणी बिल, वीज बिलाचा खर्च देखील 10 ते 15 हजार रुपये असेल. हा सर्व खर्च जोडल्यास सुरुवातीच्या टप्प्यात 2 ते 3 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

योग्य जागेची करा निवड 

मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे योग्य जागा असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्याकडे गावाकडे शेतजमीन असल्यास त्याच जागेवर हा व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. एवढेच नाही तर या जागेच्या ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा, वीज पुरवठ्याची सोय असणे देखील गरजेचे आहे. 

तळ्याची निर्मिती केल्यानंतर त्यातील पाणी स्वच्छ राहील याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. आठवड्यातून एकदा अथवा महिन्यातून दोनदा तळ्याची सफाई करण्याची गरज आहे. पाण्याची पीएच लेव्हल योग्य असायला हवी. 

तसेच, या व्यवसायासाठी तुम्हाला काही उपकरणांची गरज भासेल. तुम्हाला फिश टँक, जाळी, पंप, हँडलिंग आणि ग्रेडिंग उपकरणे खरेदी करावे लागेल.

माशांच्या योग्य प्रजातीची करा निवड? 

मत्स्यपालन व्यवसायत माशांच्या योग्य प्रजातीची निवड करणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. तुमच्या जवळील बाजारात कोणत्या माशांना सर्वाधिक मागणी आहे, त्याची माहिती घ्या. तुम्ही शिंगाडा मासा, रोहू, ट्युना, कटला, कोई फिश, सिल्वर कार्प, वाम सारख्या माशांचे पालन करू शकता. तुम्हाला एकाच तळ्यात एकापेक्षा अधिक माशांच्या प्रजातीचे पालन करता येईल.

माशांच्या वाढीसाठी त्यांना चांगला व पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे. तळ्यातच उगवणारे नैसर्गिक खाद्य त्यांच्यासाठी उपयोगी ठरते. याशिवाय, फिश पॉवडर, तांदळाचा कोंडा, रेशम असे इतर खाद्य देखील वापरू शकता. 

सरकारी कर्ज व अनुदानाचा घ्या फायदा 

मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसल्यास तुम्ही सरकारी कर्ज योजना व अनुदानाचा देखील लाभ घेऊ शकता. नाबार्ड, पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळेल.