महाराष्ट्रात सहकारी बँकांचे मोठे जाळे विस्तारलेले आहे. या सहकारी बँकांकडून ग्राहकांना फिक्स डिपॉझिटवर वेगवेगळ्या प्रकारचे व्याजदर दिले जात आहेत. यामध्ये सर्वसाधारण ग्राहकांना 5 टक्क्यांपासून 7 टक्क्यांपर्यंत मुदत ठेवींवर व्याजदर दिले जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवर 0.50 ते 0.60 टक्के अधिक व्याजदर दिला जात आहे.सहकाही बँका ग्राहकांना अनेक प्रकारच्या सेवा देतात. त्यात मुदत ठेवींचादेखील समावेश आहे.
Table of contents [Show]
सर्वाधिक व्याजदर कोणती सहकारी बँक देते?
सध्याच्या घडीला भारत को-ऑप. बँकही 1 वर्ष आणि 18 महिन्यांपेक्षा जास्तीच्या मुदत ठेवींवर 7.30 टक्के व्याजदर देते. तर ज्येष्ठ नागरिकांना ही बँक 7.70 टक्के व्याज देते.
सारस्वत को-ऑप. बँक 17 महिने ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवर सर्वसाधारण ग्राहकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज देते.
अभ्युदय को-ऑप. बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर नियमित ग्राहकांना 7.60 टक्के व्याज देते. तर याच कालावधीसाठी सिनिअर सिटिझन्सना 8.10 टक्के व्याज देते.
एनकेजीएसबी को-ऑप. बँक 12 ते 15 महिन्यांच्या एफडीवर सर्वसाधारण ग्राहकांना 7.15 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज देत आहे.
अपना सहकारी बँक 25 ते 36 महिन्यांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक 7 टक्के व्याज साधारण ग्राहकांना देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के व्याज देत आहे.
कॉसमॉस बँक को-ऑप. बँक 36 महिन्यांपेक्षा अधिक ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर सरसकट सर्व ग्राहकांना 7.35 टक्के व्याजदर देत आहे.
को-ऑप. बँकांमध्ये गुंतवणूक कशी करावी?
राज्यातील अनेक सहकारी बँकांनी ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. तर या ऑनलाईन पोर्टलवरून संबंधित बँकेच्या वेबसाईटवर लॉगिन करून फिक्स डिपॉझिटचा पर्याय निवडून त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. पण तुम्ही जर त्या सहकारी बँकेचे नियमित ग्राहक नसाल, तर तुम्हाला ऑनलाईन सेवेची सुविधा वापरता येणार नाही. अशा ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन कागदपत्रे सबमिट करून खाते सुरू करता येते.
को-ऑप. बँकेतील मुदत ठेवींचा फायदा काय?
- सहकारी बँका या इतर बँकांच्या तुलनेत मुदत ठेवींवर जास्त व्याज देतात.
- कमी कालावधीच्या मुदत ठेवींचे विविध पर्याय उपलब्ध. त्यामुळे कमी कालावधीत जास्त व्याज मिळू शकते.
- सहकारी बँकांमध्ये खाते सुरू करण्यासाठी खूप वाट पाहावी लागत नाही. या बँकांमधली प्रक्रिया लगेच पूर्ण होते.
- सहकारी बँकांची स्थापना मुळात लोकांना सहकार्य करण्याच्या उद्देशातून झाली आहे. त्यामुळे या बँकांमधून ग्राहकांना सर्वप्रकारचे सहकार्य मिळते.
सहकारी बँकांबाबत सतत विचारले जाणारे प्रश्न
सहकारी बँक म्हणजे काय?
सहकारी बँक ही एका समुदायाने किंवा समुहाने एकत्रित येऊन सर्वांच्या सहकार्याने सुरू केलेली असते. या बँकांचा मूळ उद्देश लोकांना आर्थिकदृष्ट्या सहकार्य करणे हा असतो. विशेषकरून आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील लोकांना बँकेच्या सर्व सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सहकारी बँका करत असतात.
सहकारी बँकांचे व्याजदर समान असतात का?
नाही, सर्व सहकारी बँकांचे व्याजदर समान नसतात. प्रत्येक बँकेचे व्याजदर, कालावधी हे वेगवेगळे असतात.
सहकारी बँकांचा एफडी कालावधी किती असतो?
प्रत्येक सहकारी बँकांचा मुदत ठेवींचा कालावधी वेगवेगळा असतो. पण सहकारी बँकांचा कमाल कालावधी हा 10 वर्षांचा असतो.
सहकारी बँकांना कोणाचे नियम लागू होतात?
सहकारी बँका या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार काम करतात. त्यांना केंद्र सरकारचा बँकिंग नियमन कायदा लागू होतो. तसेच या सहकारी बँका प्रशासकीय दृष्ट्या या राज्य सरकारच्या सहकार आयुक्त व निबंधकाच्या अखत्यारित येतात.